मुंबई

पालकमंत्री म्हणून कार्यालय सगळ्यांसाठी खुले - लोढा

प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांना स्वतंत्र कार्यालय दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांच्या उपस्थिती शुक्रवारी कार्यालयाचा ताबा घेतला. दरम्यान, पालकमंत्र्यांचे कार्यालय सगळ्यांसाठी खुले असून, मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे दालन उपलब्ध करण्यात आले.

भाजप, शिंदेंची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत असून, हे सरकार घरात बसून काम करत नाही, असा टोला लोढा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, कमलेश यादव, उज्वला मोडक, राजश्री शिरवडकर, अभिजित सामंत आदी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेत गेल्या १६ महिन्यांपासून नगरसेवक नसल्याने प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे पालिकेतील सर्वच वैधानिक व इतर समित्यांची दालने बंद अवस्थेत आहेत. तसेच तळमजल्यावर असलेले सर्व पक्षीय कार्यालयेही मागील ८ महिन्यांपासून बंद असल्याने माजी नगरसेवकांना बसण्याची पंचाईत झाली आहे. असे असताना उपनगराचे पालक मंत्री आणि भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांना मुख्यालयातील हेरिटेज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बाजार आणि उद्यान समिती कार्यालयात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे 'नागरिक कक्ष कार्यालय' बनवण्यात आले आहे. गुरुवारी या दालनाबाहेर लोढा यांचा नामफलक लावण्यात आल्यानंतर महापालिकेत चर्चेचा विषय बनला.

पालिकेत आतापर्यंत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्ष व विविध समित्यांच्या अध्यक्षांची दालने व त्यांचे नामफलक लावण्यात आले आहेत; मात्र आता पालिकेच्या इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांचे दालन आणि नामफलक पाहून आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. शुक्रवारी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक याबाबत पालिका आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र ते आलेच नाही. परंतु लोढा यांनी संध्याकाळी भाजपच्या माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या दालनाचा ताबाही घेतला.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दालन!

कोणाला काय म्हणायचे असेल, ते म्हणू द्या आम्ही जनतेत जाऊन कामे करणारे आहोत, सोशल मीडियावर नाही. हे दालन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी असेल. येथे सर्वपक्षीय नगरसेवक येऊ शकतात. हे कार्यालय माझे नाही, तर पालकमंत्र्याचे आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. मधल्या काळात जनता दरबारचे आयोजन उपनगरात केले होते. त्यावेळी लोकांचे १५ हजार अर्ज आहे होते. त्यापैकी साडेतीन हजार अर्जांचा निपटारा केला. त्यांचे प्रश्न मार्गी लावले. मुंबई शहरामधील नागरिकांचेही प्रश्न आहेत. त्यामुळे मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दिपक केसरकर यांचेही दालन पालिका मुख्यालयात हवे अशी सुचना पालक मंत्री लोढा यांनी केली.

- मंगल प्रभात लोढा, उपनगरचे पालकमंत्री

१५ दिवसांपूर्वी लोढा यांनी पत्र दिले - आयुक्त

मंगल प्रभात लोढा यांनी मला पंधरा दिवसापूर्वी अशा प्रकारचे पत्र दिलं होतं की, त्यांना मुंबई महानगरपालिकेत त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालय हवे आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी काही भागात पाण्याचा उपसा योग्य प्रकारे होत आहे याची पहाणी केली, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

-डॉ. इक्बाल सिंह चहल, पालिका आयुक्त

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस