अडीच वर्षांच्या सत्ता काळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती भक्कम केली. मात्र मुख्यमंत्रीपद असो वा गृह खाते एकनाथ शिंदे यांना भाजपने डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचे रुसवे-फुगवे साइट ट्रॅक करत अजित पवार यांच्याबरोबर भाजपने जवळीक वाढवली आहे. भाजपची चाल ओळखत आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना अधिक मजबूत करत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी रणनीती आखली आहे. शिवसेना खासदार, आमदार, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख व पदाधिकाऱ्यांना पक्षबांधणीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान, गुरुवारी रामटेक बंगल्यावर आयोजित बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला. महायुतीला जनतेचा कौल मिळाला यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोलाची भूमिका आहे. मात्र भाजपला १३२ जागांवर विजय मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात सत्ता स्थापनेत भाजपला घड्याळाची साथ असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना साइट ट्रॅक केले जात आहे. त्यात अजित पवारांचा सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी वाढतच आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात राहणे पसंत केले. भाजपची चाल ओळखत एकनाथ शिंदे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखली आहे. यात पक्षातील खासदार, आमदार, वरिष्ठ पदाधिकारी आदींना मुंबई पिंजून काढत पालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गेल्या २५ वर्षांत मुंबई उपेक्षित!
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने एक हाती सत्ता स्थापन करण्याचा बहुमान दिला. त्यानंतर आता मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी महायुती जोमाने कामाला लागली आहे. मुंबईकरांचे आरोग्य, स्वच्छ व सुंदर मुंबई, मुंबईकरांना मोफत औषधोपचार देणे, खड्डेमुक्त मुंबई यासाठी महायुती अधिक ऊर्जेने काम करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणार असून मुंबई बाहेर फेकल्या गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार आहे. गेला २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेत सत्तेचा उपभोग घेतला, पण मुंबईकरांना काय दिले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मुंबईकर मुंबईतच राहणार - एकनाथ शिंदे
आता सुरक्षित मुंबई महिलांना द्यायची आहे. त्यासाठी ही निवडणूक लढवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितले की, मुंबईला आर्थिक कमतरता भासणार नाही. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आमच्या वैचारिक भूमिका सारख्या आहेत. त्यासाठी २०२२ मध्ये आम्ही निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांचे सरकार आले. काही जागांवर किरकोळ मतांनी पराभव झाला. दरम्यान, जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला त्याला मुंबईत आणण्याचे काम आपले सरकार करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
यावर भर!
मतदारसंघांत संघटन बांधणी
मतदारांच्या अपेक्षा
धनुष्यबाण घराघरात पोहोचवणे
पक्षाला अधिक मजबूत करणे