मुंबई : महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या राजकीय हत्याकांडांपैकी एक असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने शनिवारी (दि. २०) महत्त्वपूर्ण निकाल दिला. तब्बल दोन दशकांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
निर्णय देताना विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. नावंदर यांनी माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही. त्याने वेळोवेळी जबाब बदलले असून, त्याच्या साक्षीच्या आधारे शिक्षा देता येणार नाही. तसेच संशयाचा फायदा घेऊन गुन्हा सिद्ध करता येत नाही," असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
या निरीक्षणांच्या आधारे पद्मसिंह पाटील यांच्यासह दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, पारसमल जैन, मोहन शुक्ला, कैलास यादव, सतीश मंदाडे आणि शशिकांत कुलकर्णी या सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
२००६ मधील दुहेरी हत्याकांडाने खळबळ
अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद अब्दुल वहिद काझी यांची ३ जून २००६ रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्येमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप
घटनेनंतर पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीबाई निंबाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. धाराशिवमधील राजकीय वैरातून माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनीच हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत भाऊ असून त्यांनी राज्यात गृहमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली होती. हत्याकांडाच्या तपासादरम्यान CBI ने जून २००९ मध्ये त्यांना अटक केली. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.
२००८ मध्ये तपास सीबीआयकडे
या आरोपांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने २००८ मध्ये प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग केला. त्यानंतर आरोपींच्या अटक, तपास, साक्षीदारांचे जबाब आणि दीर्घ सुनावण्या अशा अनेक टप्प्यांतून हे प्रकरण पुढे गेले. पद्मसिंह पाटील यांनी २५ ते ३० लाख रुपयांची सुपारी देऊन हा कट रचल्याचा दावा सीबीआयने केला होता.
१५ वर्षे चालली सुनावणी
या प्रकरणाची सुनावणी जुलै २०११ मध्ये सुरू झाली होती. गेल्या १५ वर्षांत विशेष न्यायालयाने एकूण १२८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. अनेक राजकीय आणि कायदेशीर घडामोडींमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत राहिले. या साक्षीदारांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाही समावेश होता. माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांच्या कबुलीजबाबात अण्णा हजारे यांच्या हत्येसाठीही स्वतंत्र सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर अण्णा हजारे यांनी न्यायालयात साक्ष देताना पद्मसिंह पाटील यांच्याकडून धमक्या मिळाल्याचा दावा केला होता.
निकालासाठी अनेकदा प्रतीक्षा
या प्रकरणाचा निकाल १७ जून रोजी जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र, विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश नावंदर यांनी निकाल लेखन पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत सुनावणी २० जूनपर्यंत तहकूब केली होती. त्यामुळे जवळपास दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.
विशेष न्यायालयाचा निकाल
अखेर शनिवारी अनेक वर्षांच्या सुनावण्या आणि पुराव्यांच्या तपासणीनंतर विशेष न्यायालयाने पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे जवळपास दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा न्यायालयीन शेवट झाला.