मुंबई

कोस्टल रोडचा काही भाग मुंबईकरांच्या सेवेत; थंडानी जंक्शन-वरळी ते मरीन लाईन्स अंशतः खुला होणार

Swapnil S

मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कोस्टल रोडचा काही भाग फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. थंडानी जंक्शन-वरळी ते मरीन लाईन्सपर्यंत काही भाग खुला करण्याबाबत विचाराधीन आहे. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पाचे ८३.६५ टक्के काम फत्ते झाले आहे.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाची सुरुवात झाली. कोस्टल रोड प्रकल्पात एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या 'मावळा' टनेल बोअरिंग मशिनने २.०७२ किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात आले आहेत. यातील पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे काम ९ एप्रिल २०२२ मध्ये सुरू झाले आणि दुसऱ्या बोगद्याचे काम 'मावळा'ने ३० मे २०२३ रोजी फत्ते केले. ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ८३.६५ टक्के काम फत्ते झाले असून, थंडानी जंक्शन-वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंतचा भाग पुढील महिनाभरात मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

३० ते ३५ मिनिटांची बचत!

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून कोस्टल रोड प्रत्यक्ष मुंबईकरांच्या सेवेत आल्यानंतर रोज ६० हजारांहून अधिक वाहनांची ये-जा होणार आहे. विशेष म्हणजे कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आल्यानंतर मरीन ड्राईव्ह-वरळी-वांद्रे सी लिंक वांद्रे टोक फक्त ८ मिनिटांत प्रवास होणार असून ३० ते ३५ मिनिटांची बचत होणार आहे.

सायकल ट्रॅक, खुले नाट्यगृह !

न्यायालयाच्या परवानगीमुळे नागरी सुविधांमधील १,८५६ वाहनांच्या पार्किंगसह प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत फुटपाथ, जेट्टी अशी कामे वेगाने सुरू आहेत.

‘असा’ साकारतोय कोस्टल रोड

रस्त्याची लांबी - १०.५८ कि.मी.

मार्गिका संख्या - ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)

भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी - ४.३५ कि.मी.

पुलांची एकूण लांबी - २.१९ कि.मी.

बोगदे - दुहेरी बोगद्यांची लांबी - प्रत्येकी २.०७ कि.मी., ११ मीटर अंतर्गत व्यास (प्रत्येकी ३ वाहनमार्गिका)

भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था

आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था

उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये युटीलिटी बॉक्स

भूमिगत वाहनतळ - ०४, एकूण वाहनसंख्या - १८५६

‘असे’ होतेय काम

पॅकेज चार

९१.७० टक्के काम पूर्ण

पॅकेज वन

८५.०२ टक्के काम पूर्ण

पॅकेज दोन

७०.८० टक्के काम पूर्ण

पर्जन्य जलवाहिनी

८७.२० टक्के काम पूर्ण

मेन पूल

८१.६५ टक्के काम पूर्ण

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस