मुंबई

मुंबईला तांत्रिक-आर्थिक राजधानी बनविणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढनिर्धार, २९ हजार ४०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास, सशक्त वर्तमान आणि समृद्ध भविष्याची स्वप्ने आहेत. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महाराष्ट्र राज्याची महत्त्वाची भूमिका आहे. राज्यातील उद्योग, कृषी आणि वित्त क्षेत्राच्या पॉवरने मुंबईला देशाचे आर्थिक केंद्र बनवले आहे. याच सामर्थ्याचा वापर करून महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठी आर्थिक पॉवर बनविण्यासह मुंबईला जगातील तांत्रिक-आर्थिक राजधानी बनविण्याचे लक्ष्य असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले. भारत जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता होईल, असेही भाकित त्यांनी वर्तविले.

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबई दौरा केला. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन, रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी तब्बल २९ हजार ४०० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले.

वाढवण बंदरामुळे १० लाख रोजगारनिर्मिती

केंद्र सरकारने वाढवण बंदराला मान्यता दिली आहे. ७६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे १० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचे भव्य किल्ले, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पर्वतराजीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी, महाराष्ट्राने पर्यटनात अव्वल स्थान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली. “महाराष्ट्र भारतात विकासाचा नवा अध्याय लिहिणार आहे आणि आम्ही त्याचे सहप्रवासी आहोत, आजचा कार्यक्रम अशा संकल्पांसाठी सरकारची वचनबद्धता असल्याचे अधोरेखित करत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचे जीवनमान उंचावे हे आमचे ध्येय आहे. आम्ही मुंबईच्या जवळपासच्या भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. अटल सेतूला काही लोक विरोध करत होते. मात्र आज सेतूवरून दररोज सुमारे २० हजार वाहने धावत आहेत. यामुळे अंदाजे २०-२५ लाख रुपयांच्या इंधनाची बचत होत असून प्रवासाच्या वेळेत बचत होत आहे. मुंबईत मेट्रो जाळे वेगाने विकसित होत आहे. दशकापूर्वी मेट्रो मार्गाची लांबी ८ किलोमीटर होती. ती आता ८० किलोमीटर झाली आहे आणि २०० किलोमीटर मेट्रो नेटवर्कवर काम सुरू असल्याचे मोदी म्हणाले.

छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नागपूर स्टेशनच्या पुनर्विकासाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय रेल्वेच्या परिवर्तनाचा मुंबई आणि महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक स्टेशनवर नवीन प्लॅटफॉर्म राष्ट्राला समर्पित करण्यात आले असून तेथून २४ डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या चालवता येतील.

गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी तिपटीने वाढल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प हे निसर्गाचे आणि प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर काही मिनिटांनी कमी होणार आहे. पंतप्रधानांनी देशाच्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला.

एनडीए सरकारचे विकास मॉडेल वंचितांना प्राधान्य देण्याचे आहे. गरीबांसाठी ३ कोटी घरे बांधण्याच्या नवीन सरकारच्या पहिल्या निर्णयाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. ४ कोटी कुटुंबांना आधीच घरे मिळाली आहेत. महाराष्ट्रातील लाखो दलित व वंचितांनाही आवास योजनेचा लाभ झाला. शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आदी यावेळी उपस्थित होते.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था