मुंबई : ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून पोलीस या हत्येचा कट रचणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करत पूर्णेकर कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
या हत्या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच एसआयटीकडून तपास काढून अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे हा तपास सोपवण्यात यावा तसेच राजेंद्र शिंदे यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
ठाण्याच्या मानपाडा परिसरातील गणेश नगर येथील कार्यालयात शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून हत्येचा कट रचणारे अद्याप मोकाट फिरत असल्याचा दावा करतात या हत्येमागे क्लस्टर पुनर्विकासाचा वाद असल्याचा संशय याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे.
ही याचिका न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सादर करत त्यावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत सुनावणी ५ डिसेंबर पर्यंत तहकूब केली.
ठाण्यातील उबाठाचे विभागाप्रमुख पूर्णेकर यांची हत्या होऊन एक महिना झाला आहे. तरीही मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली नाही.