मुंबई

१९७० मध्येही स्थापन केलेली प्रतिशिवसेना !

प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता त्यांनी थेट शिवसेना पक्षच हायजॅक करण्याची तयारी चालवली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे नवीन नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे निश्चित केल्याची चर्चा असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कुणालाही शिवसेनाप्रमुखांचे नाव वापरता येणार नाही, असा इशाराच बंडखोरांना दिला आहे; मात्र खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत प्रतिशिवसेना स्थापन झाली होती आणि तीही बाळासाहेबांच्या उमेदीच्या काळात. कदाचित, हा इतिहास आजच्या शिवसैनिकांना ज्ञात नसेलही. १९ जून १९६६ साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने ‘शिवसेने’ची स्थापना झाली. भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची शपथ घेऊन शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर १९६९मध्ये पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ४० नगरसेवक निवडून आले. पहिल्याच महापालिका निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले होते. या विजयात भाई शिंगारे यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यांचे भाऊ बंडू शिंगारे यांनी लालबाग-परळ भागात आपले चांगले बस्तान बसवले होते. त्यावेळी मुंबईतील आस्थापनांमध्ये परप्रांतीयांना मिळणाऱ्या नोकऱ्यांची यादी ‘मार्मिक’मध्ये छापून येत होती. त्यामुळे योग्यता असूनही नोकऱ्या मिळत नसल्याने स्थानिक मराठी माणसांचा रोष खदखदत होता. १९७०मध्ये महागाईने सामान्य जनता त्रस्त होती. अनेक ठिकाणी साठेबाजी केली जात होती.

त्याच वेळी बंडू शिंगारे यांनी मुंबईतील काही गोदामे फोडून खळबळ उडवून दिली होती; मात्र बंडू शिंगारे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्याचे बाळासाहेब ठाकरेंना सहन न झाल्याने त्यांनी शिंगारेंना पक्षाच्या बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. भरसभेत आपला अपमान झाल्याने बंडू शिंगारे संतापले होते. त्यानंतर त्यांनी थेट बाळासाहेबांनाच आव्हान दिले. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच त्यांनीही बंडखोरी करत प्रतिशिवसेनेची स्थापना केली. शिंगारेंनी स्वत:ला प्रतिशिवसेनाप्रमुख अशी उपाधीदेखील लावली.

बाळासाहेबांचा करिश्मा कुणालाही जमणारा नव्हता. तो बंडू शिंगारे यांनाही जमला नाही. प्रतिशिवसेना स्थापन केल्यानंतर त्यांना बाळासाहेबांप्रमाणे धमक दाखवता आली नाही. बाळासाहेबांचे विचार, नेतृत्वक्षमता, तरुणांमध्ये जोश फुंकणारी जहाल वाणी, तसेच समाज-राजकारणातले व्यंग अचूकपणे टिपण्याचे कौशल्य हे बाळासाहेबांचे गुण बंडू शिंगारे यांच्याकडे नव्हते. बाळासाहेबांनी मराठी तरुणांच्या असंतोषाचा आतल्या आत धगधगणारा ज्वालामुखी जागृत केला होता. शिवसेनेची लोकप्रियता वाढत असताना, सेनेच्या आंदोलनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

या ओघात बंडू शिंगारेंची प्रतिशिवसेना थंडावत गेली आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला फोडण्याचा बंडू शिंगारेंचा डाव फसला. सध्या एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४५ पेक्षा जास्त आमदारांचे समर्थन घेऊन पत्करलेला पवित्रा या १९७०च्या प्रतिशिवसेनेच्या आठवणी ताजा करणारा ठरला आहे.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम