तेजस वाघमारे/मुंबई
शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसरात उभारण्यात येणारा प्रस्तावित कॉरिडोर वादात सापडला आहे. रहिवासी आणि येथील दुकानदारांना विश्वासात न घेता, कॉरिडोर प्रकल्प राबविण्यात येत असल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाने याला तीव्र विरोध केला आहे. स्थानिक रहिवासी आणि दुकानदारही या प्रकल्पाविरोधात असल्याने कॉरिडोरचा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
मुंबादेवी हे एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर १८ व्या शतकात बांधले गेले होते. 'कोळी' मच्छिमार किंवा मुंबईचे सुरुवातीचे रहिवासी मुंबादेवीचा खूप आदर आणि सन्मान करतात. देवी मुंबादेवीला ‘देवी शक्ती’ किंवा शक्तीची देवी म्हणून ओळखले जाते. आज हे भव्य मंदिर मुंबईतील भुलेश्वर येथे गर्दीच्या स्टील, कापड बाजार आणि दागिन्यांच्या दुकानांमध्ये आहे. मुंबई शहराचे नाव मुंबादेवी देवीवरून पडले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. मुंबादेवीला मुंबई शहराची संरक्षक देवी देखील मानले जाते. या मंदिराच्या दर्शनासाठी सुमारे १० हजार भाविक येत असतात.
नवरात्र उत्सव, दिवाळी तसेच दर आठवड्याच्या रविवारी मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. आधीच गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या परिसरात मोठी गर्दी होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मुंबादेवी मंदिर परिसरात कॉरिडोर प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाला स्थानिक रहिवासी, दुकानदार, राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. हा प्रकल्प कंत्राटदाराच्या हितासाठी राबविण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे.
आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र
मुंबादेवी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडोर प्रकल्प हा मुंबादेवी मंदिर, स्थानिक रहिवासी आणि दुकानदार यांच्या हिताचा नसून, त्यांच्या विरोधात आहे. येथील स्थानिक रहिवासी आणि दुकानदार हे याच परिसरात अनेक वर्षांपासून आपला व्यवसाय आणि निवास करत आहेत. कंत्राटदाराच्या आर्थिक हितासाठी स्थानिक लोकांचे हक्क आणि जीवनमान धोक्यात आणणारा कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्यांचे हित लक्षात घेतल्याशिवाय या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये. तसेच या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यापूर्वी मंदिर न्यास समिती, स्थानिक दुकानदार, स्थानिक रहिवासी आणि संबंधितांना विश्वासात घेऊन त्यांचा सहभाग सुनिश्चित करून निर्णय घेण्यात यावा, असे पत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
मुंबादेवी मंदिराचा इतिहास
मुंबादेवी मंदिर प्रथम बोरीबंदर येथे १६७५ मध्ये बांधले गेले होते, असे मानले जाते. हे मंदिर उद्ध्वस्त करून १७३७ मध्ये भुलेश्वर येथील झवेरी बाजार येथे मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. प्राचीन काळापासून, कोळी मच्छिमार आणि द्रविड लोक या मंदिरात मुंबादेवीची पूजा करत आहेत.
महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे मुंबादेवी मंदिरात येणाऱ्या भक्तांची गैरसोय होणार आहे. खरेतर सुशोभीकरणाचा लोकांना कोणताही फायदा नाही. पार्किंग उभारण्याऐवजी ती जागा मंदिर ट्रस्टला द्यायला हवी होती. मात्र ती काही लोकांच्या घश्यात घालण्याचा डाव दिसत आहे. या कामामुळे दुकानदारांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे महापालिकेने कामे करण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.
- संतोष घरत, रहिवासी
मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यापूर्वी या भागातील विकास आराखडा तयार करायला हवा. मंदिराच्या सुरक्षेसाठी सुरक्षा भिंत उभारणे गरजेचे आहे. सध्या ज्या पद्धतीने सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्याऐवजी सध्या आहे तसा मंदिर परिसर ठेवल्यास अधिक उत्तम होईल.
- रमेश पांजरी, रहिवासी