मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी धारावीतील चर्मोद्योग केंद्राला भेट देऊन या उद्योगातील कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. चर्मोद्योग कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणे हा या भेटीमागील उद्देश होता.
धारावी हे जगातील सर्वात मोठे चर्मोद्योग केंद्र आहे. येथे २० हजारांहून अधिक चर्मोद्योग उत्पादन युनिट असून त्यामध्ये जवळपास एक लाखाहून अधिक कामगारांना रोजगार मिळतो.
धारावीतील भेटीत राहुल गांधी यांनी चर्मोद्योग क्षेत्रातील कामगारांशी संवाद साधला, त्याचप्रमाणे गांधी यांनी उद्योजकांशीही संवाद साधला. गांधी हे दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आले असून गुरुवारी रात्री त्यांचा मुक्काम मुंबईतच आहे, शुक्रवारी सकाळी ते अहमदाबादला रवाना होणार आहेत. गुरुवारी सायंकाळी गांधी यांची पक्षातील कोणत्याही नेत्याशी भेट ठरलेली नाही.
चर्मोद्योग व्यावसायिकांनी दिल्या भेटवस्तू
धारावी पुनर्वसनाच्या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या धारावी भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे. यावेळी चर्मोद्योग व्यावसायिकांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी-वढेरा आणि सोनिया गांधी यांच्यासाठी बॅग, चष्म्याचे पाकीट अशा भेटवस्तू दिल्या.