मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करावा अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्या मागे एसीबीने बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू केला. कुटंबाविरोधात दोन कोटी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अटकेची शक्यता असल्याने साळवी यांच्या पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्यावतीने अॅड. राहुल आरोटे यांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली.
यावेळी मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर अन्य न्यायालयात व्यस्थ असल्याने आणि याचिकाकर्त्यांच्या वतीने जेष्ट वकील अॅड. सुदीप पासबोला हे काही दिवस अनुपलब्ध नसल्याने अॅड. आरोटे यांनी याचिकेची सुनावणी १२ फेब्रुवारीला घेण्याची विनंती केली ती न्यायालयाने मान्य केली.