संग्रहित छायाचित्र  
मुंबई

'सावली' बार पत्नीच्या नावावर ही वस्तुस्थिती; बारमालकाची जबाबदारी केवळ दारूपुरतीच सीमित – रामदास कदम

कांदिवलीमधील ज्या बारवर पोलिसांनी कारवाई केली तो बार आपल्या पत्नीच्या नावावर असल्याची स्पष्ट कबुली राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : कांदिवलीमधील ज्या बारवर पोलिसांनी कारवाई केली तो बार आपल्या पत्नीच्या नावावर असल्याची स्पष्ट कबुली राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली. आमचा तो बार गेल्या ३० वर्षांपासून एक शेट्टी नावाचा इसम चालवतो आहे. बार मालकाची जबाबदारी केवळ दारूसंदर्भात असते, मात्र, डान्स व इतर गोष्टींसंदर्भात मालकाला जबाबदार धरता येत नाही, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असून या डान्सबारवर आणि तेथील २२ बारबालांवर अलीकडेच पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती देत शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेत केल्याने खळबळ माजली होती.

रामदास कदम म्हणाले, अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि या अर्धवट वकिलाच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे चालतात, त्यामुळेच त्यांची अशी अवस्था झाली आहे. आमचा तो बार गेल्या ३० वर्षांपासून एक शेट्टी नावाचा इसम चालवतो आहे. त्या हॉटेल आणि बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावाने आहे ही वस्तुस्थिती आहे. तसेच तिच्या नावाने ऑर्केस्ट्राचा परवाना देखील आहे. मुलींचे, वेटरचे लायसन्स देखील आमच्याकडे आहे. परंतु, ते काही अनधिकृत नाही. तिथे अनधिकृतपणे डान्स चालत नाही. ...तर मालक जबाबदार नाही शिवसेनेचे (शिंदे) नेते म्हणाले, त्या बारमध्ये एक गोष्ट घडली की, एका ग्राहकाने तिथल्या मुलीवर पैसे उधळले होते. त्यानंतर पोलीस तिथे गेले. मला ती गोष्ट समजल्यानंतर मी तात्काळ ऑर्केस्ट्रा व मुलींचे लायसन्स पोलिसांना सुपूर्द केले आणि हॉटेल बंद केले. कारण अशा घाणेरड्या पैशांची मला आवश्यकता नाही. ते अर्धवट वकील पुरेशी माहिती देत नाहीत. त्यांना कायदा माहित नाही. बार मालकाची केवळ दारूबाबत जबाबदारी असते. मात्र, डान्स व इतर गोष्टींसंदर्भात मालकाला जबाबदार धरता येत नाही.

अब्रुनुकसानीचा दावा करणार डान्सबार व हॉटेल संदर्भातील कलमात म्हटले आहे की, करार करून एखाद्या इसमाला हॉटेल व बार चालवायला दिल्यानंतर तिथे घडणाऱ्या सर्व गोष्टींसाठी तो इसम जबाबदार असेल. मालक जबाबदार नसतो, असा नियम आहे. परंतु त्या अर्धवट वकिलांना या नियमाची माहितीच नाही. अनिल परब केवळ मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मी देखील आता वकिलांचा सल्ला घेऊन अनिल परब यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करता येतोय का, याची चाचपणी करत आहे, असेही रामदास कदम म्हणाले.

कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेणे हा एक नवा प्रघात; CAG च्या अहवालात ताशेरे

भारत-पाकिस्तान युद्धात ५ विमाने पाडण्यात आली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; भाषिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

...तर 'मविआ'त राहण्यात अर्थ नाही; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

गुगल, 'मेटा 'ला ED ची नोटीस; अवैध ऑनलाईन सट्टेबाजी ॲप प्रकरण