मुंबई

नवाब मलिक यांना शिवडी कोर्टाचा दिलासा; मोहित कंबोज बदनामी प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट रद्द

खटल्याची पुढील सुनावणी २५ ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवली.

नवशक्ती Web Desk

मुंबई : कॉर्डिलीया क्रूझ ड्रग्ज सेवन प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईनंतर भाजप कार्यकर्ता मोहित कंबोज यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केल्याप्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माजी मंत्री नवाब मलिक यांना मंगळवारी शिवडीच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दिलासा दिला. मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. मलिक यांनी मंगळवारी न्यायालयात व्यक्तिश: हजेरी लावल्यानंतर न्यायालयाने ते वॉरंट रद्द केले.

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईनंतर मलिक यांनी बदनामीकारक विधाने केल्याचा आरोप करत मोहित कंबोज यांनी काही महिन्यांपूर्वी मलिक यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची शिवडी दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी एस. बी. काळे यांनी ऑगस्टमध्ये मलिक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र मंगळवारी सुनावणीच्यावेळी मलिक यांनी स्वत: न्यायालयात हजेरी लावली.

न्यायालयाने त्यांच्या हजेरीची नोंद घेत हे वॉरंट रद्द केले. याचवेळी मलिक यांना २ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत खटल्याची पुढील सुनावणी २५ ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवली.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत