मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयात सुरू असलेल्या ३६ वर्षे जुन्या खटल्यातून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान ग्रँट रोड रेल्वे स्थानक येथे करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनासाठी त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. अखेर बुधवारी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
ग्रँट रोड स्थानकावर केला होता रेल रोको
१९८९ सालच्या रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान विद्यमान मंत्री मंगलप्रभात लोढा हे तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते. या आंदोलनादरम्यान लोढा यांच्या नेतृत्वाखाली ग्रँट रोड स्थानकावर रेल रोको आंदोलन झाले होते. तब्बल ३६ वर्षे हा खटला सुरू राहिला. रामजन्मभूमी आंदोलनात हिंदूंच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी आणि रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी संपूर्ण देशभर अनेक भागांत विविध ठिकाणी वेगवेगळे खटले दाखल झाले होते. त्यातील हा एक खटला होता.