Mumbai : बनावट SIR लिंक पाठवून गंडा; निवृत्त डॉक्टरची ६.७१ लाखांची फसवणूक 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : बनावट SIR लिंक पाठवून गंडा; निवृत्त डॉक्टरची ६.७१ लाखांची फसवणूक

मतदार यादीच्या विशेष तपासणी मोहिमेचा आधार घेत सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

मुंबई : मतदार यादीच्या विशेष तपासणी मोहिमेचा आधार घेत सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट मतदार पडताळणी लिंक पाठवून एका ७७ वर्षीय निवृत्त भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त डॉक्टरची तब्बल ६.७१ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.

निवृत्त डॉक्टरची ६.७१ लाखांची फसवणूक

डॉ. प्रताप रामचंद्र बोंगीरवार (मानखुर्द) यांनी नुकताच मतदार तपासणीसाठीचा अर्ज भरला होता. त्यानंतर २९ जुलै रोजी डॉ. बोंगीरवार यांच्या मोबाईलवर एक एसएमएस आला. त्यात या अर्जाबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते आणि त्यासाठी एक मोबाईल क्रमांक देण्यात आला होता.

दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरील व्यक्तीने स्वतःला निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याचे सांगितले. अर्जातील त्यांच्या नावात आणि वडिलांच्या नावात तफावत असल्याचा दावा करून ती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाइन पडताळणी करावी लागेल, असे सांगण्यात आले.

त्यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅपवर कथित मतदार पडताळणी संकेतस्थळाची लिंक पाठवली आणि त्यावरून एसआयआर फॉर्म डाउनलोड करून प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले.

लिंकवर विश्वास ठेवून डॉ. बोंगीरवार यांनी संकेतस्थळ उघडले आणि आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक तसेच इतर वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर पडताळणी शुल्क म्हणून ₹५ भरण्यास सांगण्यात आले.

सुरुवातीला त्यांनी बँक खात्याचा तपशील भरून पैसे भरण्याचा प्रयत्न केला. व्यवहार पूर्ण न झाल्याचे दिसताच आरोपीने क्रेडिट कार्डद्वारे पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले. दुसऱ्यांदाही व्यवहार अयशस्वी झाल्याचे दिसले. मात्र त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर अनेक वन-टाइम पासवर्ड संदेश येऊ लागल्याने त्यांना संशय आला.

फोन तात्काळ बंद करून त्यांनी बँकेचे व्यवहार तपासले असता, त्यांच्या बँक खात्यातून आणि क्रेडिट कार्डमधून ₹६,७१,००६ रक्कम फसवणुकीने काढल्याचे आढळले. या रकमेतील काही भाग एटीएममधूनही काढण्यात आला होता.

घटना लक्षात येताच डॉ. बोंगीरवार यांनी त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला.

नागरिकांसाठी पोलिसांचा इशारा

पोलीसांनी नागरिकांना मतदार पडताळणी किंवा SIR प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या अनोळखी कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. SIR संदर्भातील सर्व प्रक्रिया फक्त निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच कराव्यात. तसेच कोणत्याही परिस्थितीत बँक खाते, डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती किंवा OTP अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये, असेही पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पावसाने चकवले; एल निनोचे अंदाज फसले, मुंबईत दोन महिन्यांत ८३ टक्के पाऊस

भोंदूबाबा अशोक खरातला ७ ऑगस्टपर्यंत कोठडी

'नीट पीजी' परीक्षा नियमांत मोठा बदल

'एसटी'च्या सुट्या भागांच्या खरेदीचे रखडले करार; कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप, चौकशीची मागणी

भिवंडीत खड्ड्याने घेतला महिलेचा बळी