मुंबई : अवैध ट्रेडिंगद्वारे सर्वसामान्यांसह शासनाची फसवणूक करणाऱ्या एका रॅकेटचा कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी जतीन सुरेशभाई मेहता या शेअर ब्रोकरला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईलसह एक टॅब, एक लॅपटॉप, एक पेपर थ्रेडर, ५० हजार रुपयांची कॅश, एक राऊटर आणि एक पेनड्राईव्ह असा मुद्देमाल जप्त केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या शेअरची खरेदी-विक्री करून जतीनने आतापर्यंत शासनाच्या सुमारे दोन कोटींचा महसूल बुडविला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कांदिवलीतील एका कार्यालयातून स्टॉक एक्सचेंजची कोणतीही अधिकृत परवाना न घेताना मुडी या ऍपद्वारे काहीजण अवैध ट्रेडिंग घेत असून, त्यातून शासनाची फसवणूक करत असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना मिळाल होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने मंगळवारी कांदिवलीतील महावीरनगर, संकेत इमारतीच्या एका कार्यालयात छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी जतीन मेहता याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालयातून इतर मुद्देमाल जप्त केला. मार्च ते जून या कालावधीत त्याचा स्टॉक एक्सचेंजबाहेरील शेअर खरेदी-विक्रीचा टर्नओव्हर काढला असता तो ४ हजार ६७२ कोटी रुपयांचा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याविरुद्ध कट रचून शासनाचा महसूलचा अपहारासह फसवणूक करणे तसेच सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून, त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.