हॉटेलच्या लिफ्टमध्ये कथित विनयभंगाच्या घटनेनंतर १० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात एस्प्लानेड न्यायालयाने २ आरोपी महिलांना पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये एका मराठी अभिनेत्रीच्या सुनेचा समावेश असून, दोघींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अँटी-एक्स्टॉर्शन सेलने तपासासाठी अधिक वेळ मागितला होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कांदिवली येथील रहिवासी मराठी अभिनेत्री हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बाने (वय ३९) तसेच सांताक्रूझ येथील अमरिना इक्बाल झवेरी उर्फ अॅलिस उर्फ अमरिना मॅथ्यू फर्नांडिस (वय ३३) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हेमलता पाटकर स्वतः मनोरंजन विश्वात कार्यरत असून 'आई कुठे काय करते' या मालिकेतील कांचन देशमुख हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची ती सून आहे.
आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संशय
पोलीसांनी न्यायालयाला सांगितले की, हेमलता पाटकर हिच्यावर मेघवाडी पोलीस ठाण्यात पूर्वीही एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे तिचा तत्सम गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का हे पाहणे गरजेचे आहे. तसेच इतर संभाव्य पीडितांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
फिर्यादीने खंडणीची रक्कम कशी आणि कोणत्या पद्धतीने द्यायची याबाबत सविस्तर लेखी नोंदी सादर केल्या आहेत. मात्र अजून हेमलता पाटकरचे हस्ताक्षर नमुने घेणे बाकी असून, अमरिना झवेरीचे व्हॉइस सॅम्पल्सही मिळालेले नाहीत. दोन्ही आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मोबाईल डेटा डिलीट, फॉरेन्सिक तपास सुरू
पोलीस तपासात आरोपींनी त्यांच्या मोबाईल फोनमधील महत्त्वाचा डेटा डिलीट केल्याचे उघड झाले असून, फॉरेन्सिक पद्धतीने माहिती पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरू आहे. कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) मिळवण्यात आले असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. इतर फरार सहआरोपींचाही शोध घेतला जात आहे.
लोअर परळमधील हॉटेलमध्ये सापळा
२३ डिसेंबर रोजी लोअर परळ येथील ब्रिटिश ब्रुइंग कंपनी (BBC) हॉटेलमध्ये पोलिसांनी सापळा रचला होता. पंचांच्या उपस्थितीत हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून भारतीय पुरावा कायद्यानुसार प्रमाणपत्रही मिळवण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपींना १.५ कोटी रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. यामध्ये डमी चलनाचाही समावेश होता. याशिवाय फिर्यादी आणि आरोपींमधील खंडणीसंदर्भातील संभाषणांचे ऑडिओ रेकॉर्डिंग असलेले पेनड्राइव्हही पोलिसांनी जप्त केले आहेत.
खंडणीची रक्कम ५.५ कोटींवरून १० कोटींवर
या प्रकरणातील फिर्यादी अरविंद गोयल (वय ५२), गोरेगाव पश्चिम येथील बांधकाम व्यावसायिक आहेत. गोयल यांनी आरोप केला आहे की, अंबोली पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाविरोधात दाखल असलेला गुन्हा मिटवण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला ५.५ कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर ही मागणी वाढवून १० कोटी रुपये करण्यात आली आणि पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली.
दरम्यान, अमरिना झवेरी हिने दावा केला आहे की, हॉटेलमध्ये कार्यरत असताना गोयल यांचा मुलगा ऋथम याने तिच्यावर लेझर लाईट टाकली, ज्यामुळे वाद झाला आणि झटापटीत तिला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतरच संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
तसेच अमरिनाचा कथित प्रियकर उत्कर्ष याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असून, त्याने आरोपी आणि फिर्यादी यांच्यातील भेटी घडवून आणल्याचा आरोप आहे.