मुंबई

सांताक्रूझमध्ये फसवणुकीचा मोठा प्रकार; बनावट पॅनकार्डद्वारे सुरक्षा रक्षकाच्या नावावर कंपनी, ₹२.२ कोटींची उलाढाल

Mumbai News : पनवेल येथे राहणारे आणि सांताक्रूझ (पूर्व) येथील कॅरिबियन शिपिंग कंपनीत काम करणारे सुरक्षा रक्षक ऑस्टिन फ्रोज (३१) यांना आयकर विभागाकडून नोटीस आली होती.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील सांताक्रूझमधील एका सुरक्षा रक्षकाच्या पॅनकार्डचा गैरवापर करून तब्बल ₹२.२ कोटींचे आर्थिक व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वार्षिक उत्पन्न केवळ ३ लाख रुपये असतानाही आयकर नोटिसा मिळू लागल्याने रक्षकाला संशय आला आणि अखेर या बनावट घटनेचा पर्दाफाश झाला.

पनवेल येथे राहणारे आणि सांताक्रूझ (पूर्व) येथील कॅरिबियन शिपिंग कंपनीत काम करणारे सुरक्षा रक्षक ऑस्टिन फ्रोज (३१) यांना आयकर विभागाकडून नोटीस आली होती. त्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये आहे. अशातच, त्यांना २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांमध्ये त्यांनी कर भरला नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

नोटीस आली म्हणून...

ऑस्टिन फ्रोज यांना एप्रिलमध्ये पहिली नोटीस आली होती. त्यावेळी त्यांनी त्या नोटीसला गांभीर्याने घेतलं नाही. त्यानंतर त्यांना जुलैमध्ये पुन्हा एक नोटीस आली. तेव्हा त्यांच्या पत्नी मारिया यांनी सीए विशाल कोठारी यांना याबाबतची माहिती दिली.तपास केल्यावर असे लक्षात आले की, ही नोटीस खरी आहे. यानंतर हे दाम्पत्य दादर येथील आयकर कार्यालयात गेले. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती धक्कादायक होती.

पॅन क्रमांक सारखाच पण सही मात्र वेगळी

२०१९ मध्ये ‘ग्राफिकल ट्रेडिंग कंपनी’ नावाची कंपनी ऑस्टिन यांच्या पॅनकार्डचा वापर करून नोंदणीकृत करण्यात आली होती. या कंपनीसाठी जीएसटी क्रमांकही काढण्यात आला होता आणि त्याद्वारे तब्बल ₹२.२ कोटींचे व्यवहार करण्यात आले होते. तपासात असे समोर आले की, कंपनी नोंदणीसाठी वापरलेला पॅन क्रमांक ऑस्टिन यांच्यासारखाच होता; मात्र अर्जावरील फोटो आणि सही पूर्णपणे वेगळी होती.

वाकोला पोलिसांत गुन्हा दाखल

या गंभीर गैरवापरानंतर ऑस्टिन फ्रोज यांनी वाकोला पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध IPC कलम ४२० (फसवणूक), ४६७ (महत्त्वपूर्ण कागदपत्रांची बनावट), तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत

Mumbai : पालिका सुधार समितीत महायुतीत खदखद; भाजप नगरसेवकांची पक्षनेतृत्वाकडे तक्रार

शाळांमध्ये ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; घर आणि शाळा यांच्यात समन्वय वाढ‌वणार, वर्षातून चार वेळा आयोजन

Mumbai : ‘डोंगरीचा राजा’, ‘धारावीचा चिंतामणी’चे उत्साहात आगमन; ढोल-ताशांचा गजर, भाविकांची गर्दी

Mumbai : पाणी तुंबण्याची समस्या दूर होणार; मिलन सबवेच्या धर्तीवर मानखुर्द सबवेत पंपिंग स्टेशन उभारणार, १४ कोटी खर्च करणार