मुंबई : शालेय शिक्षण विभागाने सीबीएससी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयाचे शिक्षक भारती संघटनेने स्वागत केले असून इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा न करता ऐच्छिक असावा, असा ठराव शिक्षक भारती संघटना राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
शिक्षक भारती संघटनेची बैठक १८ एप्रिल रोजी सानेगुरुजी स्मारक, पुणे येथे अशोक बेलसरे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली. राज्याच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. याला राज्यभरातून विरोध होत असतानाच शिक्षक भारती संघटनेनेही विरोध केला आहे. हिंदी विषय ऐच्छिक असावा. हिंदी विषयाला उर्दू , गुजराती, तेलगू, कन्नड, तमिळ अशा कोणत्याही भारतीय भाषा यापैकी एक जी विद्यार्थ्यांची मातृभाषा आहे ते निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा जीआर रद्द करावा. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत. पूर्वीप्रमाणे संच मान्यता करून प्रत्येक विषयाला शिक्षक मंजूर करावा. तसेच कला क्रीडा साठी स्वतंत्र विशेष शिक्षक द्यावा, या ठरावासह शिक्षण व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विरोधी निर्णयांचा विरोध करण्यासाठी विधान परिषदेत आपला प्रतिनिधी असणे आवश्यक आहे, असे मत शिक्षक भारती संघटनेच्या वतीने मांडण्यात आले.
२०२६ मध्ये होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूक शिक्षक भारती ताकदीने लढवेल, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. यावेळी अमरावती शिक्षक मतदार संघातून शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर यांची उमेदवारी एकमताने जाहीर करण्यात आल्याचा ठराव संमत झाला. अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.