मुंबई : जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःची शिवसेना स्थापन केली. त्यावेळेपासून दोन शिवसेना महाराष्ट्रात अस्तित्वात आल्या असून दोन्ही शिवसेना एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. राज्यात दोन शिवसेना निर्माण झाल्यानंतर यंदाचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असला तरी प्रत्यक्षात ५९ वा वर्धापन साजरा करण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेचा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन वरळीतील डोम येथे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. दरम्यान, `हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी` असा आशय असलेले व्यंगचित्र प्रसिद्ध करत वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे सेनेने ठाकरेंना डिवचले आहे.
अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ५६ जागा निवडून आल्या. तर ठाकरेंच्या शिवसेनेला २० जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले. परंतु, विधानसभेत शिंदेंनी बाजी मारली. मुंबईत १० जागा ठाकरेंच्या शिवसेनेला राखता आल्या. येत्या दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडण्याची चिन्हे आहेत. येत्या निवडणुकीपूर्वी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता संदेश देणार, कोणते राजकीय भाष्य करणार किंवा कुणाला लक्ष्य करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पक्षाचे नेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, संघटनांचे प्रतिनिधी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. बडगुजर यांच्यावर ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.
ठाकरे - शिंदे आमने सामने?
शिंदेंची शिवसेना आगामी मुंबई महापालिका निवडणूक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि नियोजनाखाली लढणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे थेट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.