एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया... १४ मे रोजीच्या सभेत मास्क काढून बोलणार असल्याचे सांगत शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या सभेविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दादागिरी मोडून कशी काढायची, हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेले आहे, असा थेट इशारा विरोधकांना देत उद्धव ठाकरे यांनी सभेत काय बोलणार, याचे संकेतच दिले आहेत.
शिवसेनेच्या या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी १५ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून ते या सभेतून उध्दव ठाकरे यांना उत्तर देणार आहेत. शनिवारी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर शिवसेनेच्या वतीने जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांच्या अंतराने उद्धव ठाकरे हे अशा प्रकारे जाहीर मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने ते भाजप आणि मनसे यांनी केलेल्या आरोपांना काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरून राज्य सरकारला अल्टीमेटम देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात गेले महिनाभर तणावाचे वातावरण निर्माण केले. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांना टाळून वक्तव्य करत होते; मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. भोंगे, हनुमान चालिसावरुन शिवसेनेच्या हिंदुत्वाला राज ठाकरे यांनी दिलेले आव्हान, त्यातच चारच दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवायांवरून राज ठाकरेंनी ‘सत्ता येत-जात असते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उध्दव ठाकरे तुम्हीही नाही...’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांना फटकारले होते. याचा समाचार उध्दव ठाकरे थेटपणे घेण्याची शक्यता आहे. शिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १ मे च्या सभेत उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला उद्देशून ‘ तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही’ असे बोलून शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे फडणवीस यांचाही ते समाचार घेण्याची शक्यता आहे.
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती, बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी उघडलेली शिवसेनेच्या विरोधातील आघाडी आणि या दरम्यान ठाकरे यांची मानहानी करणारी वक्तव्ये करणारे राणा दाम्पत्य यांचाही या सभेत ते समाचार घेणार आहेत. शिवसेना नेते, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे या सभेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. एमएमआरडीए मैदानात दीड लाख लोक बसू शकतात, एवढी क्षमता आहे. शिवाय शिवसेनेने मुंबई शहर आणि परिसरातील शिवसैनिकांना या सभेला येण्याचे आवाहन केले आहे.