मुंबई : नोव्हेंबर २० रोजी झालेल्या महाराष्ट्र निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (ठाकरे गट) गेल्या काही दिवसांत त्यांच्या मूळ हिंदुत्व अजेंड्याकडे परत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर केंद्र सरकारवर पक्षाकडून टीका केली आहे. शेजारील देशातील शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर ऑगस्टमध्ये हे अत्याचार वाढले होते. तसेच मुंबईबाहेरील दादर स्टेशनसमोरील एका ८० वर्षे जुन्या हनुमान मंदिराला रेल्वेने दिलेल्या पाडकामाच्या नोटिशीविरुद्ध संरक्षणासाठी पक्ष पुढे आला आहे.
पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करत शनिवारी मंदिरात 'महाआरती' केली. तर पक्षाने हिंदुत्वाच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
यापूर्वी, ६ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेचे छायाचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर प्रकाशित केले होते. तसेच शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या `माझ्या लोकांनी हे केले याचा मला अभिमान आहे` असा उल्लेख केला होता.
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील ही मशीद पाडण्यात आली होती.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबाबत केंद्र सरकारवर टीका केली आणि शेजारील देशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी भारताने कोणती पावले उचलली याबाबत विचारणाही केली.
राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना (ठाकरे गट) ने २०१९ मध्ये भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जुळवून घेतल्याने त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काहीसा लाभ झाला. मात्र पक्षाचा मुख्य मतदारवर्ग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपकडे वळल्याचे गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिल्याचे मानले जाते.
२०१७ मध्ये शिवसेना आणि भाजपने बीएमसीच्या निवडणुकीत कडवी लढत दिली होती. यावेळी शिवसेनेने ८४ आणि भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. मात्र २०२२ पासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकांपूर्वी पक्षाला पुन्हा हिंदुत्व अजेंडा राबविण्याची गरज भासली आहे.
शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्याने पक्ष भाजपच्या `शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे` या आरोपाला चोख प्रत्युत्तर देण्यात कमी पडल्याचे मान्य केले. विधानसभा प्रचारादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या `एक है, तो सेफ है’ आणि `बटेंगे तो कटेंगे` या घोषणा चर्चेत असताना शिवेसना मागे पडल्याचे विधानसभा निकालावरून स्पष्ट झाल्याचे जाणकार सांगतात.
२०१९ मध्ये शिवसेनेच्या (ठाकरे गट) धर्मनिरपेक्ष भूमिकेने काही ठिकाणी फायदा झाला, मात्र विधानसभा निवडणुकीत मुख्य मतदारवर्ग गमावला गेल्याचे निरिक्षण एका राजकीय पत्रकाराने व्यक्त केले. यामुळेच पक्ष आता पुन्हा हिंदुत्वाचा अजेंडा राबवित असल्याचेही सांगण्यात आले.
अन्य एका वरिष्ठ राजकीय पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, शिवसेना हिंदुत्वाकडे परत जात असल्याचे मुख्य कारण यंदाच्या विधानसभा निवडणूक पराभवांमधून आलेली निराशा हे होय. २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी राजकारणात धर्म मिसळण्याची चूक झाली, असे म्हटले होते. मात्र आता पक्ष पुन्हा हिंदुत्वाचा विषय लावून धरणार आहे.
...म्हणूनच सपाही बाहेर
मविआत सहयोगी राहिलेल्या समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, शिवसेनेच्या नव्या भूमिकेमुळे ते मविआतून बाहेर पडले. मविआत काँग्रेस, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचा समावेश आहे. पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे की, नार्वेकर यांनी हे विधान नेतृत्वाच्या अनुमतीशिवाय दिले नसावे.