मुंबई : श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणग्यांतील गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. गेल्या पाच वर्षांतील मंदिराचे सर्व दस्तावेज आणि नोंदी यांची तपासणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचा अपहार होत असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला होता. या आरोपानंतर मंदिरातील नऊ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली होती.
तपशील मुख्यमंत्र्यांना सादर
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या एका शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेऊन २०२३ ते २०२६ या कालावधीतील जमा-खर्चाचा सविस्तर तपशील सादर केला. या भेटीनंतर फडणवीस यांनी ही व्यापक चौकशी करण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणाचा चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मनसेच्या आरोपानंतर प्रकरण उघड
गेल्या महिन्यातच एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी स्वतंत्र चौकशीचे निर्देश दिले होते. मनसेच्या आरोपानंतर हे प्रकरण समोर आले होते. यानंतर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिंदे गटातील नेते सदा सरवणकर यांनी या चोरीप्रकरणी नऊ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली होती.