मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर टोकाची भूमिका न घेता सर्वसमावेशक मार्ग काढावा लागेल. आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे जाऊन १६ टक्क्यांनी वाढविली तर सर्वच प्रश्न सुटू शकतात. ते करताना ओबीसी किंवा इतर कोणाच्याही आरक्षणातून वेगळा वाटा काढण्याची गरज नाही. तामिळनाडूत तर ७४ टक्क्यांपर्यंत आरक्षण वाढविण्यात आले आहे. ते न्यायालयात टिकले देखील. न्यायालयाचे अनेक निर्णय सध्याच्या केंद्र सरकारने कायदा करून बदलले आहेत. केंद्र सरकारकडे तो पर्याय देखील उपलब्ध आहे. मात्र, काही लोकांना हा प्रश्न सोडवायचा नाही, तर घोंगडे भिजत ठेवायचे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शरद पवार बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर टोकाची भूमिका कोणी घेऊ नये. सामोपचाराने हा प्रश्न निश्चित सुटू शकतो. असे सांगून शरद पवार म्हणाले, ‘‘आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवली. त्यात १६ टक्क्यांची भर घातली तर सर्व प्रश्न सुटू शकतात. असे करताना गरीबाच्या ताटातील भाकरी काढण्याची म्हणजे ओबीसी किंवा इतर समाजाच्या आरक्षणातील वाटा काढण्याची गरजच भासणार नाही. तामिळनाडूत तर आरक्षणाची मर्यादा ७४ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला होता. कुळवाडी भूषण असा त्यांनी महाराजांचा उल्लेख केला होता. इतकी वर्षे लोकांनी हे वर्णन स्वीकारले. आज यावरून कशाला वाद करायचा, असे पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळच्या पक्षाच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राज्य सहकारी बँक, सिंचन घोटाळा असे ते म्हणाले, पण त्यांचा रोख ज्यांच्याकडे होता त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. यावरून ते किती तत्त्वनिष्ठ आहेत, हे दिसून आले. त्यामुळे कोणी पक्ष व चिन्ह यावरून संभ्रम निर्माण करत असेल तर त्याची चिंता करू नका. उलट आपल्याला ही संधी आहे. नवीन लोकांना आपल्याकडे संधी मिळणार आहे. मी स्वत: सहा वेळा विविध चिन्हांवर लढलो आणि जिंकून आलो. फक्त जनतेत राहण्याची गरज असते. लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही. सर्वसामान्य लोकांच्या मनात झालेल्या प्रकारांमुळे अस्वस्थता असल्याचे पवार म्हणाले.
नेत्यांचे फोन आले म्हणून कारवाई
‘‘लाठीमारप्रकरणी ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, त्यांच्याशी माझे बोलणे झाले. मुंबईतून नेत्यांचे फोन गेले, त्यानुसार कारवाई केली म्हणून आपण शिक्षाही भोगली, हे त्यांनी आपल्याला सांगितल्याचेही शरद पवार म्हणाले. पक्ष आणि चिन्हाची चिंता करू नका. जनतेत राहा. आपण लोकांच्यात राहिलो तर पक्ष आणि चिन्हाच्या नावाची गरज नसते. मी स्वत: सहा निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आणि जिंकलो, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचाही प्रयत्न केला.
‘भारत’ला भाजपचाच विरोध
मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना २००४ साली त्यांनी विधानसभेत इंडियाऐवजी भारत अशा उल्लेखाचा ठराव मांडला होता. बहुमताने तो संमतही झाला होता. फक्त एकाच पक्षाचा त्याला विरोध होता, तो पक्ष म्हणजे भाजप. त्यावेळी भाजपने सभात्याग केला होता. आज केवळ जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. गेटवे ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काय करणार, असा सवालही शरद पवार यांनी केला.