वसई पश्चिम पट्टयातील वाहतूककोंडी कमी होणार; सोपारा-गास-सनसिटी आणि नारंगी-आगाशी बायपास रस्ते प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

वसई पश्चिम पट्टयातील वाहतूककोंडी कमी होणार; सोपारा-गास-सनसिटी आणि नारंगी-आगाशी बायपास रस्ते

वसईतील नागरी समस्या निवारण समितीच्या शिष्टमंडळाने नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांची भेट घेऊन परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी पश्चिम पट्ट्यातील वाढत्या वाहतूककोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना म्हणून सोपारा-गास-सनसिटी तसेच नारंगी-आगाशी बायपास रस्ते उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.

Swapnil S

वसई : वसईतील नागरी समस्या निवारण समितीच्या शिष्टमंडळाने नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांची भेट घेऊन परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी पश्चिम पट्ट्यातील वाढत्या वाहतूककोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना म्हणून सोपारा-गास-सनसिटी तसेच नारंगी-आगाशी बायपास रस्ते उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.

बैठकीत वसईच्या पश्चिम भागातील विद्यमान रस्ते वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरे पडत असल्याने पर्यायी मार्गांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. त्यावर आमदार नाईक यांनी सोपारा-गास मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नालासोपारा पोलीस ठाण्याच्या बाजूने सोपारा-गास-सनसिटी असा पर्यायी बायपास रस्ता उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. तसेच बोळींज-कोफराड-उंबरगोठण मार्गावरील वाढत्या रहदारीला पर्याय म्हणून नारंगी उड्डाणपूल ते आगाशी असा बायपास रस्ता विकसित करण्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास पश्चिम पट्ट्यातील वाहतुकीचा मोठा भार कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत गास, नाळे आणिनिर्मळ येथील तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण, गावांतील रस्त्यांवर गटारे व पदपथांची उभारणी, महानगरपालिकेची परिवहन सेवा नियमित करणे, तसेच पश्चिम पट्ट्यात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे डीप क्लीन पद्धतीने सफाई न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

याशिवाय, वसई किल्ला आणि इतर पर्यटनस्थळांचा विकास, मुख्य सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, तसेच पश्चिम व पूर्व हरितपट्ट्यातील गावांचे अस्तित्व टिकवण्यासाठी गावांमध्ये एफएसआय मर्यादित ठेवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, नागरी समस्या निवारण समिती ही अराजकीय नागरिक मंच म्हणून गेल्या दीड ते दोन वर्षांपासून विविध नागरी प्रश्नांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधत असून, समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आपण स्वतः या भागात राहत असल्याने स्थानिक समस्यांची पूर्ण जाणीव असल्याचे सांगितले. नारंगी-आगाशी आणि सोपारा-गास-सनसिटी बायपास हे खर्चिक असले तरी दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प असून त्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच वसई किल्ल्यातील चर्च आणि इतर पर्यटनस्थळांच्या विकासासाठी संबंधित विभागांसोबत बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. वसईतील ख्रिस्ती समाजाला राज्य अल्पसंख्यांक आयोगावर प्रतिनिधित्व मिळावे, यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार.
राजन नाईक, आमदार

Navi Mumbai : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा TTC औद्योगिक क्षेत्राला फटका; वाहतूक, उत्पादन आणि निर्यात खर्चात वाढ, लघुउद्योग आर्थिक दबावाखाली

Pune : १८ महिला कॅडेट्ससह ३५३ जणांची यशस्वी लष्करी झेप; NDA च्या १५० व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा

Mumbai : सायन उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा खीळ; पहिल्या गर्डर लाँचिंगला विलंब, १५ ऑगस्टपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता धूसर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रायश्चित्त घ्यावे! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

बारामती बसस्थानक स्वच्छतेत पहिले; पटकावले एक कोटींचे बक्षीस