Mumbai : नाकाबंदी दरम्यान कारची पोलिसांना धडक (Photo - FPJ)
मुंबई

Mumbai : नाकाबंदी दरम्यान कारची पोलिसांना धडक

दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात रविवारी पहाटे ५.२० च्या सुमारास नाकाबंदी दरम्यान एका भरधाव मर्सिडीज कारने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली.

Swapnil S

मुंबई : दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात रविवारी पहाटे ५.२० च्या सुमारास नाकाबंदी दरम्यान एका भरधाव मर्सिडीज कारने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली.

मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक कृष्णकांत मिश्रा आणि एमएसएफ युनिटचे कॉन्स्टेबल राठोड हे दोघे यात जखमी झाले. वैद्यकीय उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ‘द फ्री प्रेस जर्नल’शी बोलताना एएसआय कृष्णकांत मिश्रा म्हणाले, “आमची ड्युटी संपायला अवघी १० मिनिटे शिल्लक होती. मी माझ्या मोबाईलवर वेळ पाहत असतानाच अचानक एक कार १०० किमी प्रतितास वेगाने आमच्या दिशेने आली आणि तिने बॅरिकेड्सना धडक दिली. बॅरिकेड्स अंगावर आल्यामुळे मी जमिनीवर पडलो. यात माझ्या डाव्या कमरेला फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे.” पोलिसांनी सांगितले की, एमएसएफ कॉन्स्टेबल राठोड यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, आरोपीची ओळख २९ वर्षीय निहाल सोलंकी अशी पटली असून तो विरारच्या पंचवटी भागातील रहिवासी आहे. नाकाबंदीत ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीचा वेग कमी करण्याऐवजी आरोपीने गाडीचा वेग वाढवला, दोन पोलिसांना धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर मरिन ड्राइव्ह पोलिसांनी शोध मोहीम राबवून रविवारी संध्याकाळी विरार येथील त्याच्या राहत्या घरून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी सोलंकीला एस्प्लेनेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी पुढे सांगितले की, सोलंकी विरारमधील एका महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असून त्याने ही कार सेकंड हँड खरेदी केली होती. तपासात असे समोर आले आहे की, तो शनिवारी रात्री उशिरा मरिन ड्राइव्ह परिसरात फिरण्यासाठी आला होता. आरोपीचे वडील व्यावसायिक आहेत.

अपघाताच्या वेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असावा, असा संशय पोलिसांना आहे. तो मद्यपान करून गाडी चालवत होता का, हे तपासण्यासाठी त्याचे रक्त नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत.

मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९(१), १२५(अ)(ब) आणि ३२४ अंतर्गत, तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४(अ)(ब) आणि १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट