मुंबई : मुंबईत बुधवारी पार पडलेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या बैठकीत चार ते पाच संचालक जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी सकाळी सुरू असताना, सदावर्ते यांच्या संचालकांनी महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप शिवसेना शिंदे अडसूळ गटाकडून करण्यात आला. सोबतच यावेळी भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा दोन्ही गटाकडून एकमेकांवर करण्यात आले. बोनस वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच, अपमानास्पद भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
या घटनेबाबत एका संचालकाने सांगितले की, आज कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला. महिलांचे कपडे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आले, जातीवाचक शिवीगाळ केली, त्यामुळे हा वाद निर्माण झाला.
माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले की, “या बँकेमध्ये सदावर्तेंनी जो भ्रष्टाचार, गैरव्यवहार केला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही बँक सुरक्षित वाटत नाही. या बँकेत १२५ कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा पैसे घेऊन करण्यात आली आहे. या बँकेच्या १२ कोटींच्या सॉफ्टवेअरसाठी सदावर्तेंच्या गटाने ५२ कोटी दिले आहेत. या सगळ्या गोष्टी आता समोर येत असल्याने सदावर्तेंनी बाहेरची माणसे आणून राडा घातला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. याप्रकरणी आम्ही नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.”