मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमा मिळाव्यात यासाठी एसटीमधील वेगवेगळ्या अठरा संघटनांची महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समिती आक्रमक झाली आहे. समितीचे धरणे आंदोलन आजपासून मुंबई सेंट्रल ऐवजी आझाद मैदानावर सुरू होणार असून आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
आंदोलनाबाबत रविवारी कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कृती समितीमधील हणमंत ताटे, श्रीरंग बरगे, संदीप शिंदे, हिरेन रेडकर, पांडुरंग वाघमारे, दादाराव डोंगरे, बंडू फड, संतोष गायकवाड उपस्थित होते.
एसटीमधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील १६ संघटना व अन्य एक महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनानी सोमवार १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाच्या नोटीस दिल्या आहेत. दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे आहे.
संघटनेच्या मागण्या
२०१८ पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नाही. सन २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत असून एकूण ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.