मुंबई

सर्वसामान्यांना सेवा देणारी एसटीची चाके थांबण्याची चिन्हे; महामंडळाची २००० कोटींची देणी थकली

देवांग भागवत

सलग ७३ वर्षे राज्यातील शहरांपासून खेड्यापाड्यापर्यंत सर्वसामान्यांना सेवा देणारी एसटीची चाके थांबण्याची चिन्हे आहेत. कोरोनाचे संकट उलटून आठ महिने होऊनही अद्याप एसटीचा महसूल वाढलेला नाही. सध्या एसटीच्या केवळ १३ हजार गाड्या चालू स्थितीत असून यातून केवळ २८ ते ३० लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यातच महामंडळाची २००० कोटींपेक्षा जास्त रकमेची देणी थकली आहेत. शासनाने वेळीच आर्थिक मदत केली नाही तर एसटी शेवटची घटका मोजेल, अशी भीती कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे.

एसटीची आर्थिक विवंचना संपता संपत नाही. दिवसेंदिवस ढासळत चाललेली एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती, नियोजनाचा अभाव तसेच कोरोना आणि संपकाळातील तब्बल अडीच वर्षात प्रवाशांनी फिरवलेली पाठ या एकूण परिस्थितीमुळे एसटीचे भवितव्य अधांतरितच आहे. मागील ६ वर्षांपासून एसटी महामंडळ आणि राज्य सरकार यांचे एसटीतील विविध उपाययोजनांबाबत दुर्लक्ष होत आहे. जानेवारी २०२० मध्ये १८ हजार ६०० बसद्वारे प्रतिदिन जवळपास ६६ लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जात होती. याकाळात एसटीचे रोजचे उत्पन्न १० ते २० कोटींच्या घरात होते. तर महिन्याला ५०० ते ६०० कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. कोरोना लाटेमुळे मार्च २०२० पासून एसटीची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. डिझेलच्या वाढत्या किमती, वाढलेल्या स्पेअर पार्टसच्या किंमती, सतत उभा राहत नादुरुस्त अवस्थेत असलेल्या बसेस, संप आणि याकाळात दुरावलेला प्रवासी यामुळे एसटीची चाके आणखी आर्थिक खोलात रुतली आहेत.

वेतनाची ६० टक्के रक्कम शासनाकडे थकीत

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला ३६० कोटी शासनाकडून मिळणे अपेक्षीत असते; मात्र यापैकी ६० टक्के रक्कम अद्याप येणे बाकी असून महामंडळाचा उर्वरित खर्च कसा भागणार? याबाबत संघटनांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सध्या १३ हजार गाड्या चालू स्थितीत आहेत. २००० कोटी पेक्षा जास्त देणी बाकी असून स्पेअर पार्टसची १०० कोटी रुपये एवढी रक्कम थकीत आहे. त्यामुळे सामान मिळत नाही व गाड्या सामानाअभावी उभ्या आहेत. शासनाने येणाऱ्या काळात महामंडळाला ही देणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत केली नाही तर राज्यातील महत्त्वाची आणि सर्वसामान्यांसाठी असणारी एसटी वाहतूक पूर्णपणे थांबेल. तर एसटी महामंडळाचा डोलारा कोलमडला जाईल.

शासनाच्या मदतीवर एसटीचे भवितव्य अवलंबून

संपानंतर एसटीचे व्यवस्थाकीय संचालक शेखर चन्ने यांनी विविध प्रयत्न केले; मात्र संपामुळे एसटीची पुढची वाटचाल बिकट बनली. अनेक आर्थिक समस्यांतून एसटी महामंडळ जात आहे. उत्पन्न वाढत नसल्याने महामंडळाची सर्व गणिते चुकली आहेत. शासनाच्या मदतीवर एसटीचे भवितव्य अवलंबून आहे.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन