सोमवार, ६ जून रोजी मरीन लाइन्स आणि चर्चगेट रेल्वे स्थानकांदरम्यान संध्याकाळी ६ च्या सुमारास एक घटना घडली. वरळी येथील रहिवासी असलेली एक महिला प्रभादेवी स्थानकातून चर्चगेट लोकलच्या महिला डब्यात चढली. चर्नी रोड स्थानक ओलांडताच एक माणूस धावत्या ट्रेनमध्ये चढला आणि त्या महिला डब्यात शिरला. गर्दी नसल्याचा गैरफायदा घेत त्या तरुणाने डब्यातील एका महिलेजवळ बसून त्रास देण्यास सुरुवात केली. भीतीपोटी घाईघाईत मरीन लाइन्स स्थानकावर ती महिला उतरली.
दुसऱ्या घटनेत ट्रेन चर्चगेट स्थानकाजवळ येत असताना एक तरुण स्थानकावर उतरण्याच्या तयारीत दरवाजाजवळ आला. महिला प्रवासी त्या ठिकाणी उतरण्यासाठी उभी होती. तिला दरवाजाजवळ पाहून आरोपी तिच्या जवळ आला आणि मरीन लाइन्स-चर्चगेट स्थानकादरम्यान एका सिग्नलवर ट्रेन थांबल्यावर आरोपीने तिची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला असता आरोपीने तिचे केस पकडून ओठांवर चुंबन घेतले. या झटापटीत त्याने तिची बॅग हिसकावून घेतली, तरी दोघांच्या हाणामारीत महिला आणि आरोपी रुळाच्या कडेला ट्रेनमधून खाली पडले. सुदैवाने तिला जास्त दुखापत झाली नसून चोराला पकडण्यातही पोलिसांना यश आले आहे.