मुंबई

ऐन दिवाळीत मुंबईकर घामाघूम! पारा ३५ ते ३६ अंशांवर; भाऊबीजपर्यंत उकाडा राहणार कायम

मुंबईत दिवाळीची धामधूम सुरू असताना मुंबईकर मात्र उकाड्याने हैराण झाले आहेत. कधी दमट हवामान, कधी आग ओकणारा सूर्य आणि पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत दिवाळीची धामधूम सुरू असताना मुंबईकर मात्र उकाड्याने हैराण झाले आहेत. कधी दमट हवामान, कधी आग ओकणारा सूर्य आणि पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती ३ नोव्हेंबर म्हणजेच भाऊबीजपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असताना मुंबईत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअसवर राहिला आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिकांचे हाल होत आहेत. बेस्ट बस आणि रेल्वेतून दुपारच्या वेळच्या प्रवासादरम्यान मुंबईकरांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. यावेळेत उकाड्याने प्रवासी हैराण होत आहेत. वाढलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक थंड पेयांचा आधार घेत आहेत.

फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता खालावण्याची भीती

एकीकडे दमट हवामानामुळे उष्णतेत वाढ झाली आहे. तसेच दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रविवारपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे समुद्र किनारी भागात दमट हवामान आणि उष्णतेत वाढ होणार आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दिवसांत तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. राज्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे. - सुष्मा नायर, हवामान विभाग, मुंबई

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव