ठाकरे बंधूंचा मुंबईत रविवारी मोर्चा संग्रहित छायाचित्र
मुंबई

ठाकरे बंधूंचा मुंबईत रविवारी मोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष काँग्रेसने रणशिंग फुंकले असतानाच, आता उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी मंगळवारी निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेविरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.

Swapnil S

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष काँग्रेसने रणशिंग फुंकले असतानाच, आता उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी मंगळवारी निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेविरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली. ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता भायखळा येथून मोर्चाला सुरुवात होणार असून तो मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाईल. महापालिका मुख्यालयासमोर मोर्चाचे विराट सभेत रूपांतर होईल. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाची माहिती दिली. “मोर्चानंतरच्या सभेत निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत सविस्तर भूमिका मांडली जाईल. हा लढा फक्त राजकीय पक्षांचा नाही तर जनतेचादेखील आहे. त्यामुळे जनतेनेही या मोर्च्यात मोठ्या संख्येने सामील व्हावे,” असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

राजकीय झेंडा नाही

‘ईव्हीएमच्या मुद्द्यावर २०१७-१८ पासून आपण विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या असून या संदर्भातील सर्व मुद्दे मोर्चात सविस्तर मांडणार आहोत. हा निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चा आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्षातील लोकांनाही या आंदोलनात सहभागी व्हायचे असल्यास तेदेखील येऊ शकतात, असे सांगत मोर्चासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना औपचारिक पत्र देण्याऐवजी फोनवरून संपर्क साधून निमंत्रण दिले जाणार आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा हा विषय असल्याने मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा असणार नाही. सर्वांच्या हातात तिरंगाच असेल,’ असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

खाई त्याला खवखवे...

विरोधी पक्षाला त्यांच्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राज ठाकरे यांनी भाजपवर टोलेबाजी केली. “मराठीमध्ये एक म्हण आहे...खाई त्याला खवखवे,”अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला.

‘सीजेपी’च्या आंदोलनाला पाठिंबा - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत २ ऑक्टोबरला होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला. यापूर्वी जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनालाही पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही वाचवण्यासाठी जे लोक आंदोलन करतील, त्यांच्यासोबत आम्ही राहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येक आंदोलनात प्रत्येकाने प्रत्यक्ष सहभागी होण्याची आवश्यकता नसून, वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ४ ऑक्टोबरनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'त्या' तालुक्यांनाही मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही

औषधांच्या दरवाढीवर ‘सर्वोच्च’ संताप; ‘कॅन्सर’ औषधांच्या १० पट जास्त नफा कमावण्यावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

Mumbai : अतिक्रमणांवर हातोडा; दादर स्थानक परिसरात पदपथ झाले मोकळे, ‘जी’ उत्तर विभागाची कारवाई

निवडणुकांमध्ये ‘फिक्सिंग’! राहुल गांधी, खर्गेंचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल; रस्त्यावर, संसदेतही संघर्ष करणार, काँग्रेसचा निर्धार

दक्षिण मुंबईतील घरसाठा ७४ टक्क्यांनी घटला; मुंबईच्या पलीकडे रिअल इस्टेटचा विस्तार, पश्चिम परिघीय भागात २४० टक्क्यांची वाढ