संग्रहित छायाचित्र  
मुंबई

BMC Election : ठाकरे सेनेकडून १२५ उमेदवारांना 'एबी फॉर्म'चे वाटप; नाराजांना ठाकरेंचा सबुरीचा सल्ला

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे व शिवसेनेच्या युतीची घोषणा झाली, मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करताच निश्चित १२५ उमेदवारांना ‘एबी फॉर्म’चे वाटप करण्यात आले. मात्र, उमेदवार पळवापळवी टाळण्यासाठी ठाकरे सेनेने महायुतीला चकवा देत ‘एबी फॉर्म’चे गुपचुप वाटप केले.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे व शिवसेनेच्या युतीची घोषणा झाली, मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करताच निश्चित १२५ उमेदवारांना ‘एबी फॉर्म’चे वाटप करण्यात आले. मात्र, उमेदवार पळवापळवी टाळण्यासाठी ठाकरे सेनेने महायुतीला चकवा देत ‘एबी फॉर्म’चे गुपचुप वाटप केले. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे सेना १५० जागांवर उमेदवार देणार असल्याचे समजते.

शिवसेना फुटीनंतरही ‘मातोश्री’वर इच्छुकांची रीघ लागली आहे. तब्बल १९ वर्षानंतर शिवसेना आणि मनसे हे पहिल्यांदाच युती करून निवडणुका लढवत आहेत. ठाकरेंसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. तरीही ७० जागा मनसे लढवणार असल्याचे समजते. तर शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेसाठी १५०च्या आसपास जागा लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात यादी जाहीर न करता उमेदवारांना ‘मातोश्री’वर बोलावून थेट ‘एबी फॉर्म’ देण्यात आले. शनिवारपासून सुरू झालेल्या ‘एबी फॉर्म’ वाटपात स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. ‘मातोश्री’तून फोन गेलेल्या उमेदवारांची तसेच इच्छुकांची रविवारी रात्री उशिरापर्यंत तर सोमवारी सकाळी १० वाजल्यापासूनच गर्दी जमली होती. तर अनेक प्रभागांत उमेदवारी देण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि समर्थकांच्या बैठकांमागून बैठका स्वत: उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आल्या. सोमवारी सायंकाळपर्यंत १२५ उमेदवारांना अर्ज वाटप करण्यात आले. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट नेमक्या किती जागा लढवणार तसेच त्यांच्या उमेदवारांची अंतिम यादी उद्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ नंतरच स्पष्ट होणार आहे.

माजी महापौरांचा ठिय्या

माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारीसाठी ‘मातोश्री’वर ठिय्या द्यावा लागला. किशोरी पेडणेकर यांना स्वत:च्या उमेदवारीसाठी अर्जवाटप सुरू झाल्यापासून चार फेऱ्या माराव्या लागल्या. अखेर सोमवारी सायंकाळी प्रभाग क्र. १९९ मधून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. तर शेजारील वॉर्डात शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नी अबोली खाडे यांना तर विभागप्रमुख आशीष चेंबुरकर यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी महापौर श्रद्धा जाधव या पुत्र युवासेना पदाधिकारी पवन जाधव यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. मात्र, याच विभागात आजी-माजी शाखाप्रमुखांनी उमेदवारीचा आग्रह धरल्याने तिढा निर्माण झाला. हा तिढा सोडवण्यासाठी श्रद्धा जाधव यांना ‘मातोश्री’वर प्रतीक्षेत राहावे लागले. तर विधान परिषद आमदार सुनील शिंदे हे आपले बंधू निशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते.

अखेर प्रभाग क्र. १९४ मधून निशिकांत शिंदे यांना तिकीट जाहीर करण्यात आले.

BMC Election : भाजप १३७, शिवसेना ९०; मित्रपक्षांनाही सोडणार जागा; महायुतीचा 'फॉर्म्युला' अखेर ठरला

Mumbai : भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट'ने १३ जणांना उडवले; चौघांचा मृत्यू, ९ जखमी; CCTV मध्ये कैद झाली भीषण दुर्घटना

Thane Election : मनसेने २४ जणांना दिला एबी फॉर्म; नवीन चेहऱ्यांना संधी

मुंबईकरांचे 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन धमाकेदार! मेट्रो 'ॲक्वा'च्या पहाटेपर्यंत विशेष फेऱ्या; 'बेस्ट'च्याही जादा बसेस

पुणे, पिंपरी चिंचवडसाठीच दोन राष्ट्रवादीची युती; आमदार रोहित पवार यांची घोषणा