मुंबई

धंदा बसला, २० लाखांना बुडाला २६/११ चा हिरो छोटू चहावाला कर्जाच्या खाईत

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचवले. मोहम्मद तौफिक शेख ऊर्फ छोटू चायवाला त्यापैकीच एक. ३८ वर्षीय छोटूने या हल्ल्यात दहा जणांचे प्राण वाचवले. पण, स्वत:च्या जीवाची बाजी लावणाऱ्या या हिरोचा चहाचा व्यवसाय अडचणीत आला असून त्याच्यावर २० लाखांचे कर्ज झाले आहे.

सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर छोटू चहावाल्याचा चहाचा स्टॉल होता. या हल्ल्यावेळी छोटू २३ वर्षांचा होता. त्या दिवशी भारत-द. आफ्रिका क्रिकेट सामना होता. भारत हा सामना जिंकत असल्याने तो फटाके वाजवत होता. मात्र, गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर त्याला गंभीर परिस्थितीची जाणीव झाली. त्याने तिकीट काऊंटरचे गेट बंद केले व तत्काळ सर्वांना दक्ष केले. सर्वांना त्या भागातून बाहेर काढण्यास त्याने मदत केली. हे करताना कसाबचा गोळीबार त्याने पाहिला.

तो प्रसंग आठवताना छोटू चहावाला म्हणाला की, कसाबच्या पहिल्या गोळीने रेल्वेच्या ऑफीसची खिडकी तोडली. दुसरी गोळी टेबलला लागली. त्यानंतर मी जमिनीवर लोळण घेतले. मी माझ्या पत्नीला हाक मारली. मी अडचणीत असल्याचे तिला सांगितले. मी रेल्वे पोलिसांना फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. काही वेळानंतर मी स्टेशनच्या बाहेर आलो. अनेकांना गोळ्या लागून ते जमिनीवर पडले होते. त्यातील जिवंत लोकांना मी उचलले. त्यासाठी जखमी अधिकाऱ्याला मदत केली. त्यांना भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले.

दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो. त्यांची मानसिकता स्वत: मरण्याची व नागरिकांना मारण्याची असते. असा दहशतवादी हल्ला पुन्हा होऊ नये, अशी मी प्रार्थना करतो. नाहूर येथे राहणारे शेख लहान वयात बिहारहून मुंबईत कामासाठी आले. आर्थिक अडचणींमुळे त्यांना त्यांच्या आईला गमवावे लागले.

नोकरीचे आश्वासन हवेतच

या घटनेनंतर कोविड काळात माझ्या व्यवसायाला मोठा झटका बसला. मला व्यवसायच बंद करावा लागला. जगण्यासाठी मला कर्ज घ्यावे लागले. आता माझ्या डोक्यावर २० लाखांचे कर्ज आहे. मी माझे म्हाडाचे घर तारण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेने मला कर्ज देण्यास नकार दिला. आता माझा व्यवसाय मी कर्जावर चालवत आहे. २६/११ च्या घटनेनंतर मला आर्थिक मदतीची आश्वासने दिली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी मला नोकरीचे आश्वासन दिले. माझा दिल्लीत सत्कारही केला. तरीही मला नोकरी मिळाली नाही.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त