एक्स @mieknathshinde
मुंबई

‘शिवसेना’ ही चार अक्षरे आपले ‘गॉडफादर’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

आपण सर्व नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेला घरोघरी पोहोचवण्याचे काम केले.

Swapnil S

मुंबई : आपण सर्व नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेला घरोघरी पोहोचवण्याचे काम केले. सध्या आपल्या पक्षाचा कुणीही ‘गॉडफादर’ नाही. ‘शिवसेना’ ही चार अक्षरे आपली ‘गॉडफादर’ आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला हाणला.

आपण सर्वांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असेच पुढे घेऊन जावे आणि त्यांच्या विचारावर चालावे. मला कधीही खुर्चीची लालसा नव्हती. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही आहे आणि उद्याही राहीन.

बाळासाहेबांच्या विचारांनी मी कोट्यवधी बहिणींचा भाऊ झालो, याचा मला आनंद आहे. आजचा दिवस हा आनंदाचा आणि जल्लोषाचा दिवस आहे. आम्हाला लोकसभा आणि विधानसभेत जनतेने भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच आज हा देदीप्यमान सोहळा आपण साजरा करत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“बाळासाहेबांच्या विचारांमुळेच माझ्यासारखा एका सर्वसामान्य घरातील मुलगा एवढ्या मोठ्या पदावर येऊन ठेपला. या विचारांनीच मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केले. आपण आता बाळासाहेबांची शिवसेना ही घराघरात पोहोचवण्याचा निर्धार करूया. ‘गाव तिथे शिवसेना’ आणि ‘घर तिथे शिवसैनिक’ असायला हवा. शिवसेनेला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याचा माझा निश्चय आहे, असेही शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभही केला.

“काम करो ऐसा की एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो की निशान बन जाए, यहा जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जिओ इस कदर की मिसाल बन जाए,” अशी शेरोशायरी करत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

“अडीच वर्षांपूर्वी आपण केलेला उठाव आणि त्यानंतर हा विजय इतका देदीप्यमान आणि ऐतिहासिक आहे की, संपूर्ण महाराष्ट्र, देश नाही तर जगभरात या विजयाची चर्चा आहे. पुढच्या अनेक पिढ्या या विजयाची आठवण ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. हे यश बाळासाहेबांच्या विचारांचे आणि महायुतीच्या एकजुटीचे आहे. अडीच वर्षं केलेल्या कष्टाचे यश आहे. याबरोबरच राज्यातील माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके तरुण, लाडके शेतकरी आणि लाडक्या ज्येष्ठांचे हे यश आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी लढणार - शिंदे

महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेला शिवसेनेचे ६० आमदार आपल्याला दिले, याचा मला आनंद आहे. त्यामुळे सर्व शिलेदारांचे अभिनंदन करतो. हा एकनाथ शिंदे शिवसेना वाढवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचा शब्द देतो. बाळासाहेबांच्या धगधगत्या प्रेरणेने आणि विचाराने घडलेले आपण सर्व शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला म्हणून दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि तो विजयोत्सव आज आपण साजरा करतोय, असे शिंदे म्हणाले.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत