मुंबई

राज्यपालांनी मोदींसमोर वाचला माविआ विरोधातील तक्रारींचा पाढा, म्हणाले ‘मोदी है...

राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार यांचे संबंध पहिल्यापासून ताणले गेले आहेत

प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारविरोधातील तक्रारींचा पाढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच वाचला. ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हणत राज्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे साकडेही त्यांनी पंतप्रधानांना घातले. राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार यांचे संबंध पहिल्यापासून ताणले गेले आहेत. आजच्या प्रसंगामुळे आता त्यात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच ‘जल भूषण’ या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मी औरंगाबादला गेलो होतो. तिथल्या लोकांनी सांगितले की तेथील पाणीप्रश्न बिकट आहे. पाच ते सात दिवस पाणीच मिळत नाही. अरूण जेटली काही वर्षांपूर्वी म्हणाले होते की, ‘मोदी है तो मुमकिन है’ आता मी देखील म्हणतो की ‘मोदी है तो मुमकिन है’, त्यांनीच या योजना आता पूर्ण कराव्यात. मी कुलपती देखील आहे. या नात्याने विद्यापीठांच्या कार्यक्रमांना मी जात असतो. मुंबईतही विद्यापीठांच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन इंग्रजीत होते. वक्ते भाषणेदेखील इंग्रजीत करतात. मी त्यांना सूचना दिली की सूत्रसंचालन तसेच भाषणेही मराठीतच करा. मला मराठी पूर्ण बोलता येत नसले तरी चांगल्या प्रकारे मराठी मला समजते. मुख्यमंत्र्यांना हे कसे वाटेल ते माहिती नाही, असा टोलाही राज्यपालांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.

... तरी ते कृतार्थ होतील - उद्धव ठाकरे

‘दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती’ असे म्हटले जाते. जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी किती जणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिले, किती जणांनी मरण यातना सोसल्या, क्षणभर विचार केला हे असे घडले नसते तर आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का, हा प्रश्न मनात येतो.आपल्याला स्वातंत्र्य असेच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिले हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावे लागले आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणे हे आपले काम आहे. नुसते बोलत बसण्यापेक्षा क्रांतीकारकांनी ज्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यागाच्या एक कण जरी काम आपण करू शकलो तरी त्यांचे बलिदान कृतार्थ होईल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

इतिहासातून युवा पिढीला

प्रेरणा मिळावी - पंतप्रधान

देशाच्या इतिहासातून युवा पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात लंडनमधील इंडिया हाऊस त्यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीकारकांचे कसे स्थान बनले होते त्याची आठवण त्यांनी सांगितली. वर्मा यांचे देहावसान १९३० साली झाले. त्यांनी केवळ एकच शेवटची इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या अस्थी देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा त्या देशात नेण्यात याव्यात. मात्र, त्यासाठी २००३ साल उजाडावे लागले. आपण स्वत या अस्थी लंडनहून घेऊन आलो व त्यांचे जन्मस्थान असलेल्या कच्छमधील मांडवी येथे घेऊन गेलो. आज तिथे लंडनमधील इंडिया हाऊसची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली असून हजारो विद्यार्थी तिथे भेट देऊन प्रेरणा घेत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली