राज्याच्या पोलीस दलात लवकरच सुमारे दहा हजार पोलिसांची भरती होणार असल्याचे गृहखात्याच्या सूत्रांनी सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
राज्य पोलीस दलात नुकतीच सात हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे, त्यानंतर होणारी ही मोठी भरती असून त्यामुळे पोलीस दलात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. पोलीस भरतीमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी यावेळी ही भरती प्रक्रिया राज्याचे गृहखाते राबविणार असून अत्यंत पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया होणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकर भरतीची प्रक्रिया थांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकले नव्हते. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.