पूनम अपराज
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कथित प्रमुख हस्तक अनिल पंडित याला वाँटेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहून त्याने गोळीबाराचा कट रचण्यात आणि हल्ल्यासाठी आर्थिक मदत पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई यांना वाँटेड आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. तपासानुसार, टायगर श्रॉफच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचे नियोजन आणि त्यासाठी निधीची व्यवस्था करण्यात अनिल पंडितचा सहभाग असल्याचा संशय आहे.
हरयाणात अटक करण्यात आलेला समीर हा पंडितच्या थेट संपर्कात असल्याचे तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी जतीन आणि समीर यांना हरियाणातील सोनीपत येथून अटक करण्यात आली असून, ट्रान्झिट रिमांडवर त्यांना मुंबईत आणले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या गोळीबार प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १० झाली आहे.
आरोपींना आरेच्या जंगलात नेणार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून (एईसी) अटक करण्यात आलेल्या रेहान, ऋतिक आणि फूलसिंग या कथित शूटरना गुरुवारी रात्री उशिरा आरेच्या जंगलात नेले जाण्याची शक्यता आहे. हल्ल्यापूर्वी त्यांनी ज्या ठिकाणी गोळीबाराचा सराव केल्याचा आरोप आहे, ते ठिकाण शोधण्याचा प्रयत्न तपास पथक करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपासानुसार, १७ ऑक्टोबर रोजी रेहान, फूलसिंग आणि ऋतिक यांनी बबिता आणि राधा यांच्याकडून शस्त्रे घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर ते रिक्षाने आरेच्या जंगलात गेले आणि तेथे त्यांनी गोळीबाराचा सराव केल्याचे सांगितले जाते. या रिक्षाप्रवासासाठी आरोपींनी ४०० रुपये दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चार आरोपींना पोलीस कोठडी
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी कुणाल (२१) आणि सुमित (१९) या हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील दोघांना, तसेच उत्तर प्रदेशातील राधा (२३) आणि बबिता (२३) यांना एस्प्लनेड येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. या चौघांनीही सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप पोलिसांनी केला. गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्रे पुरविण्यात या चौघांची भूमिका असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.