मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पातील पालघर येथील बोगद्याचे काम पूर्ण झाले. विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान असलेल्या पालघर जिल्ह्यातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक असलेल्या सुमारे १.५ किमी लांबीचा हा बोगदा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई-अहमदाबाद प्रवासाला फक्त १ तास ५८ मिनिटे इतका वेळ लागेल आणि त्यामुळे मोठ्या व्यापारी केंद्रांची अर्थव्यवस्था एकत्र जोडली जाईल, असा विश्वास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.
एमटी-५ बोगद्याचे उत्खनन दोन्ही बाजूंनी करण्यात आले आणि अत्याधुनिक ड्रिल आणि ब्लास्ट पद्धतीचा वापर करून १८ महिन्यांत हे उत्खनन पूर्ण झाले. या पद्धतीमुळे उत्खनन करताना प्रत्यक्ष स्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे शक्य झाल्याने प्रत्यक्ष जागेच्या परिस्थितीनुसार शॉटक्रिट, रॉक बोल्ट आणि लॅटिस गर्डरसारख्या आधार प्रणालींची उभारणी करणे शक्य झाले. बोगद्याचे खोदकाम सुरू असताना वायुवीजन, अग्निरोधक यंत्रणा आणि इतर उपाययोजना, प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था यांसह सर्व सुरक्षितता उपाय पाळण्यात आले आहेत.
१. याआधी सप्टेंबर २०२५ मध्ये ठाणे ते बीकेसी दरम्यान ५ किलोमीटर लांबीच्या पहिल्या भूमिगत बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
२. मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्पाची एकूण लांबी ५०८ किलोमीटर आहे. यामध्ये एकूण २७.४ किलोमीटर लांबीचे बोगदे असून, त्यापैकी २१ किलोमीटर भूमिगत बोगदे आणि ६.४ किलोमीटर भूपृष्ठावरील बोगदे आहेत.
३. या प्रकल्पांमध्ये आठ पर्वतीय बोगद्यांचा समावेश असून महाराष्ट्रात ६.०५ किलोमीटर एकूण लांबीचे सात बोगदे आहेत तर गुजरात मध्ये ४३० मीटर लांबीचा एक बोगदा आहे.
४. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतर आणखी संधी उपलब्ध होतील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.