मुंबई

एसटी महामंडळाचा नवा विक्रम! २.५ लाख चाकरमानी कोकणात दाखल, ५ हजारांहून अधिक बसेसमधून चाकरमान्यांचा प्रवास

गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून अडीच लाखापेक्षा अधिक चाकरमानी गेल्या ५ दिवसांत एसटीने कोकणात रवाना झाले.

Swapnil S

मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून अडीच लाखापेक्षा अधिक चाकरमानी गेल्या ५ दिवसांत एसटीने कोकणात रवाना झाले. ५ हजारांहून अधिक बसेद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. 

३ ते ८ सप्टेंबर दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूककोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत एसटी प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांतील सर्व विक्रम मोडून काढले आहेत. महामंडळाने यंदा ५ हजार बसद्वारे २.५० पेक्षा अधिक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली. यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजारांहून अधिक चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना सामोरे जात वाहतूक पार पाडली. याबद्दल महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

१२ ते १७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या परतीच्या वाहतुकीसाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण व व्यक्तिगत आरक्षणासाठी एसटी महामंडळाला प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ३ ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात १०० बस सज्ज होत्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी