मुंबई

मुंबईच्या प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक खडाजंगी; वर्षा गायकवाड-आशिष शेलार यांचे आरोप-प्रत्यारोप

मुंबईतील विविध प्रश्नांवरुन विधानसभेत बुधवारी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये खडाजंगी उडाली.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

मुंबईतील विविध प्रश्नांवरुन विधानसभेत बुधवारी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये खडाजंगी उडाली. मुंबईत समान पाणीवाटपाच्या प्रश्नावरून मुंबईकरांना पाणीवाटप योग्यरित्याने होत नसल्याचा आरोप करीत श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. मुंबईतील विविध प्रश्नांवरून आशिष शेलार यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तर विरोधी बाजूकडून धारावी, विमानतळापासून अनेक कंत्राटे आपल्या ‘मित्रा’ला देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी केला.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, या शहरांमध्ये महायुती सरकारतर्फे करण्यात आलेली कामे आणि गतिमान विकास याबाबत नियम २९३ अंतर्गतचा प्रस्ताव आशिष शेलार यांनी मांडला. या प्रस्तावावर मुंबईच्या जवळपास सर्वच आमदारांनी आपली मते मांडली.

मुंबई महापालिकेमध्ये एकाच परिवाराची सत्ता गेली २५ वर्षे असून त्यांनी मुंबईकरांकडून ३० हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्त्यता समोर येण्यासाठी मुंबईच्या पाण्याची एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मुंबई महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेचा पूर्ण बोजवारा उडाला असून या योजनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

त्याचवेळी आघाडीचे सरकार असताना मेट्रोचे काम दोन वर्षे आरे कारशेडच्या नावावर रोखण्यात आले. सद्यस्थितीत मेट्रो सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ८ कोटी लोकांनी प्रवास केला असून रोज २ लाख ३५ हजार प्रवासी प्रवास करतात. म्हणजेच उबाठाने एवढ्या सगळ्या मुंबईकरांची अडवणूक करून ठेवली होती, केवळ अहंकारापोटी आरे कारशेडचे काम अडवण्यात आले. त्यामुळे १० हजार कोटीने मुंबईचा मेट्रोचा खर्च वाढला असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली.

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी प्रत्युत्तर देताना भाजपवर जोरदार निशाणा साधाला. ‘जो जमीन सरकारकी है.. वो जमीन अदानी की है,’ अशा पद्धतीने धारावीपासून विमानतळ, विमानतळ कॉलनी अशी सर्व कंत्राटे आपल्या ‘मित्रा’ला देण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप केला. तर दोन पालकमंत्र्यांना पालिका मुख्यालयात आणून बसवले आहे. पालिका आयुक्तांवर सध्या सरकारचा दबाव आहे. निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांची बदली करण्याची नोटीस दिली आहे. ईडीची नोटीस आलेल्या पालिका आयुक्तांची व पालिकेतील अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी यावेळी वर्षा गायकवाड यांनी केली.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत