वसई-विरार महानगरपालिका  
मुंबई

वसई-विरारमध्ये सलग चौथ्यांदा खुला प्रवर्ग; अजीव पाटील आघाडीवर; भाजपला शह देण्यासाठी शेखर धुरींचीही चर्चा

वसई-विरार मनपाच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात काढण्यात आली असून, यंदाचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असणार आहे. आरक्षण जाहीर होताच खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, महापौरपदाच्या शर्यतीला जोर आला आहे.

Swapnil S

वसई : वसई-विरार मनपाच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात काढण्यात आली असून, यंदाचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असणार आहे. आरक्षण जाहीर होताच खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, महापौरपदाच्या शर्यतीला जोर आला आहे.

वसई-विरार महापालिकेत एकूण ११५ जागांपैकी बहुजन विकास आघाडी (बविआ) व मित्रपक्षांचे ७१ नगरसेवक निवडून आले आहेत. मंगळवारीच बविआने आपल्या गटाची अधिकृत स्थापना करत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची गटनेतेपदी निवड केली आहे. सत्तापदांच्या वाटपात बविआ अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांचा निर्णय अंतिम मानला जातो.

खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आमदार हितेंद्र ठाकूर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, बविआकडे महापौरपदासाठी विकासाची दृष्टी असलेले अनुभवी आणि सक्षम असे अनेक चेहरे आहेत. ज्येष्ठ नेते व नगरसेवकांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. गेल्या साडेपाच वर्षांत निर्माण झालेली प्रशासकीय अनागोंदी दूर करून शहराचा विकास वेगाने पुढे नेण्यासाठी सक्षम महापौर दिला जाईल. खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर होताच महापौरपदाच्या शर्यतीत सर्वप्रथम अजीव पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. अजीव पाटील हे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सख्खे आत्येभाऊ असून, पक्षाच्या जडणघडणीत आणि विस्तारात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ठाकूर कुटुंबीयांवर आलेल्या राजकीय संकटांच्या काळात पाटील यांनी खांद्याला खांदा लावून निष्ठेने साथ दिली आहे.

भाजपला शह देण्यासाठी शेखर धुरी यांचे नावही महापौरपदासाठी पुढे येण्याची चर्चा आहे. भाजपमध्ये ४० वर्षांहून अधिक काळ निष्ठेने काम केलेले शेखर धुरी यांनी उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी करत बविआमध्ये प्रवेश केला होता आणि प्रभाग क्रमांक २६ मधून निवडून आले आहेत.

भविष्यात वसई विधानसभा बविआकडे पुन्हा खेचण्याच्या दृष्टीने, तसेच राजकीय गणिते मजबूत करण्यासाठी वसईतीलच उमेदवाराला महापौरपद देण्याचा डाव खेळला जाऊ शकतो. या अंगाने पाहता शेखर धुरी यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत, वसई-विरार महापौरपदासाठी अजीव पाटील आघाडीवर असले तरी, शेखर धुरी हे ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतात, असे सध्याचे राजकीय चित्र आहे.

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय