विक्रोळीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कर्करोगग्रस्त बहिणीसाठी सरकारी अनुदानित घर मिळावे म्हणून धडपड करणाऱ्या एका व्यक्तीची दोन भामट्यांनी म्हाडाच्या बनावट विशेष योजनेचे आमिष दाखवून फसवणूक केली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांवर यापूर्वीही अनेक फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत.
या प्रकरणातील आरोपींची ओळख योगेश पाटणकर आणि कैलाश कीर्तने अशी आहे. दोघेही स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना सरकारी नोकरी आणि घरांच्या आमिषाने लाखो रुपयांनी फसवतात. त्यांच्याविरुद्ध आधीच सरकारी नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण नोंदवलेले आहे.
कर्करोग रुग्णासाठी घराचे आमिष
विक्रोळीतील रहिवासी जितेंद्र ठोकळे (वय ५३) हे आपल्या कुटुंबासह राहत असून, त्यांची बहीण जयश्री कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार घेत आहे. औषधे घेत असताना त्यांची ओळख कैलाश कीर्तने नावाच्या व्यक्तीशी एका मेडिकल स्टोअरमध्ये झाली. त्यानंतर कीर्तने यांनी ठोकळे यांना सांगितले की, त्यांचा मित्र योगेश पाटणकर मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहे.
कीर्तने यांनी ठोकळे यांना सांगितले की, पाटणकर यांच्या मदतीने कर्करोगग्रस्तांसाठी असलेल्या विशेष म्हाडा गृहयोजनेअंतर्गत स्वस्त दरात फ्लॅट मिळवता येईल. ठोकळे यांनी या आमिषाला बळी पडत जानेवारी ते ऑगस्ट २०२३ दरम्यान सुमारे ३० लाख रुपये हप्त्यांमध्ये अदा केले.
हप्ते दिल्यानंतर गायब झाले आरोपी
रक्कम भरल्यानंतर काही काळ दोन्ही आरोपी संपर्कात होते. मात्र नंतर त्यांनी फोन घेणे बंद केले. जेव्हा ठोकळे यांनी पैसे परत मागितले, तेव्हा दोघांनी शिवीगाळ आणि धमक्या दिल्या. त्यानंतर ठोकळे यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि फसवणुकीचा पर्दाफाश झाला.
पूर्वीही केली होती लाखोंची फसवणूक
पोलिस तपासात उघड झाले की, हेच आरोपी यापूर्वी २०१९ ते २०२१ दरम्यान गोदरेज कंपनीतील निवृत्त कर्मचारी दिलीप होवाल (वय ६३) यांची फसवणूक केली होती. तेव्हाही कीर्तनेने मेडिकल स्टोअरमधून मैत्री करत पाटणकरशी ओळख करून दिली होती. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत ८ जणांकडून एकूण ७५ लाख रुपये घेतले , मात्र नोकरी न देता उलट धमक्या दिल्या.
पोलिसांची कारवाई सुरू
विक्रोळी पोलिसांनी या नव्या प्रकरणात दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, २९४, ५०६, आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, हे दोघे आरोपी वारंवार विविध भागात तोतयागिरी व फसवणूक करून लोकांची दिशाभूल करतात. त्यांचा पूर्वेतिहास तपासला जात असून, लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.