मुंबई : मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज) कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे १ मे रोजी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. पंतप्रधान मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही सहभाग राहणार आहे.
महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती, औद्योगिक संस्कृती, पर्यटन संस्कृती आणि ज्या काही महाराष्ट्राच्या परंपरा आहेत, त्या जागतिक पातळीवर जाव्यात, यासाठी मुंबई शहराची निवड केंद्र शासनाने केलेली असल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन, तेलंगणा पॅव्हेलियन तसेच अन्य संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. त्यांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आहेत. विविध क्षेत्रांतील परिसंवाद, राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. ३ मे रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
३३ देशातील मंत्री, अधिकारी उपस्थित राहणार
कार्यक्रमात ३३ देशांतील मंत्री व मंत्रिस्तरीय अधिकारी, तसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलीवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्माते कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.
‘वेव्हज परिषद-२०२५’निमित्त डॉ. अनबलगन यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’वेव्हज-२०२५ परिषदेनिमित्त उद्योग विभागाचे सचिव डॉ. अनबलगन पी. यांच्या मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारी, २९ एप्रिल रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री ८ वाजता तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर विविध लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
वेव्ज् हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक व पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे. या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
-उदय सामंत, उद्योगमंत्री