दर्जेदार आरोग्य सुविधा देणाऱ्या मुंबई महापालिकेने २०२५पर्यंत मुंबई टीबीमुक्त करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून क्षय रोग रुग्णांची शोध मोहीम हाती घेतली असताना मुंबई टीबी मुक्तीसाठी मुंबईकर व संस्थांनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. टीबी मुक्तीसाठी निक्षय मित्र योजनेत सहभागी व्हा, असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानाच्या वतीने २०२५पर्यंत मुंबईसह देशातून टीबी रोगाचे समूळ निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. मुंबईतून टीबीचे समूळ निर्मूलन करण्यासाठी मुंबई महानगरपालिका घरोघरी जाऊन नमुने गोळा करत असून संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तीच्या थुंकीचे नमुने गोळा केले जात असून त्यांचे एक्सरे रिपोर्ट केले जात आहेत. टीबी आढळल्यास त्या रुग्णाची नोंदणी करून त्यावर योग्य उपचार केले जात असल्याचे डॉ. गोमारे म्हणाल्या.
एक किंवा अनेक रुग्णांना दत्तक घेऊ शकतात. हा खर्च सहा महिने ते तीन वर्षे असा उचलता येतो. एका रुग्णाच्या पोषण आहारासाठी दर महिन्याला ६०० ते ९०० रुपये इतका खर्च येतो. हे पैसे थेट पुरवठादाराला पाठवायचे आहेत.