मुंबई

आमदारांनी चुकीचे वर्तन केले असेल तर त्‍याचे समर्थन करणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी

“शिंदे गटातील आमदारांनी चुकीचे वर्तन केले असेल, तर त्‍याचे समर्थन कोणी करणार नाही. ते तपासून घेऊ. कायदा सगळ्यांसाठीच समान आहे. अगदी मलादेखील,” असे स्‍पष्‍टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. “विरोधी पक्षनेते अजित पवार यांना तर त्रास होणारच, कारण आघाडी सरकार तेच चालवायचे,” असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.

राज्‍य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. त्‍याच्या पूर्वसंध्येला राज्‍यमंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. त्‍यानंतर आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करत होते. त्‍यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, अतुल सावे उपस्‍थित होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि संजय बांगर यांच्या वर्तणुकीवर जोरदार आक्षेप नोंदविला आहे.

यांना सत्‍तेची मस्‍ती आली आहे काय, असा सवाल त्‍यांनी केला आहे. त्‍याबाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “कायदा सगळ्यांसाठी अगदी माझ्यासाठीदेखील समान आहे.त्‍यांचे वर्तन तपासून घेऊ. त्‍यांच्या वागण्याचे आम्‍ही समर्थन करत नाही. अजितदादांना त्रास तर होणारच कारण आघाडी सरकार तेच चालवत होते.”

मुख्यमंत्री म्हणाले की, “आघाडी सरकारच्या कोणत्‍याही निर्णयाला आम्‍ही स्‍थगिती दिलेली नाही; पण सरकार अल्‍पमतात आल्यानंतर शेवटच्या दोन दिवसांत धडाधड ३०० ते ४०० जीआर काढण्यात आले. १ रुपयाच्या कामासाठी १० रुपये देण्यात आले. जलसंधारणाच्या कामांचे तर साडेपाच हजार कोटींचे निर्णय घेऊन मोकळे झाले. अशांचे फेरअवलोकन तर होणारच,” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; मात्र राजकीय आकसापोटी कोणताही निर्णय घेणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

“राज्‍यात आमचे सरकार आल्‍यानंतर निसर्गानेदेखील कृपा केली आहे. राज्‍यातील एकाही तालुक्‍यात आज दुष्‍काळी स्‍थिती नाही. तसेच जिथे अतिवृष्‍टी झाली आहे, अशा भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशीदेखील सरकार उभे आहे. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत आम्‍ही जाहीर केली आहे. तसेच नुकसानभरपाईसाठी जमिनीची मर्यादादेखील दोनवरून तीन हेक्‍टर केल्‍याने मदतीत वाढच होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील ५० हजार जाहीर केले आहेत,” असेही मुख्यमंत्री शिंदे म्‍हणाले. केंद्र सरकारचे पथकदेखील १ ते ४ ऑगस्‍टदरम्‍यान राज्‍यातील नुकसानीची पाहणी करून गेले असल्‍याचे त्‍यांनी स्पष्‍ट केले. भंडारा बलात्‍कार प्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केली जात असून, हे प्रकरण फास्‍टट्रॅक न्यायालयात चालविण्यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस या पोर्टलच्या माध्यमातून करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.

एनडीआरएफच्या निकषांसाठी केंद्राची समिती - देवेंद्र फडणवीस

“एनडीआरएफचे निकष नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्‍यानंतरच बदलण्यात आले. आतादेखील निकषांसंदर्भात विचार करण्यासाठी केंद्र सरकारने समिती स्‍थापन केली आहे. कारण हे निकष संपूर्ण देशभर लागू होत असल्‍याने सर्व राज्‍यांची मते विचारात घेण्यात येत असतात,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले. मंत्रिमंडळावर भाजपचाच वरचष्‍मा असल्‍याच्या बातम्‍यांत कोणतेही तथ्‍य नसल्‍याचे सांगून देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, “भाजपकडे ११५ आमदार असताना आमच्या खात्‍यांना तीन लाख १७ हजार कोटींचा निधी आहे.

तर शिंदे गटाकडे ५० आमदार असताना त्‍यांना १ लाख ९७ हजार कोटींचा निधी आहे. भाजप ६० टक्‍के, तर शिवसेनेला ४० टक्के असे प्रमाण आहे; मात्र याच शिवसेनेकडे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा ५६ आमदार होते, तर केवळ १२.८८ टक्के इतकाच निधी मिळत होता, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिल्‍याची घोषणा केली होती. ती बंद खोलीत केल्‍याने त्‍यांना त्‍याचा विसर पडला असावा, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल.

गोविंदांना १० लाखांचे विमा

गोविंदा पथकांची, शासनाने विमा कवच द्यावे, ही मागणी मान्य करत गोविंदांना आता १० लाखांचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण