मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची उत्तर बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) महानगरपालिकेच्या हद्दीत ९.३० मीटरपर्यंत चाचणी स्वरूपात सरकविण्याची कार्यवाही मंगळवार, १४ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडली.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून 'ब्लॉक' जाहीर झाल्यावर पाच तासांच्या कालावधीत तुळई आणखी पुढे सरकवण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेच्या पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासह योग्य समन्वयाने कार्यवाही पूर्ण केली आहे. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) (शहर) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यावेळी उपस्थित होते.
मंगळवार, १४ जानेवारी रोजी 'ट्रायल रन' करण्यात आले आहे. तुळई सरकविण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. रेल्वे हद्दीत तुळई स्थापित करण्यासाठी 'ब्लॉक' मिळण्याबाबत मुंबई पालिकेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे विनंती केली आहे.
रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर तुळई स्थापित करण्याची पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे.
धोकादायक पुलामुळे पुनर्बांधणी
दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. कर्नाक पुलाच्या उत्तर बाजुच्या लोखंडी तुळई (गर्डर) चे ५५० मेट्रिक टन सुटे भाग प्रकल्पस्थळावर दाखल झाल्यावर जोडकाम प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.