१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स Photo : X
राष्ट्रीय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

AI आणि YouTube च्या मदतीने १२१ बनावट APK अ‍ॅप्स तयार करून देशभरातील २,९२८ जणांची ६५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी १८ वर्षीय तरुणाला सुरत सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली.

Mayuri Gawade

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि यूट्यूबवरील व्हिडिओंची मदत घेऊन कोडिंग शिकलेल्या अवघ्या १८ वर्षीय तरुणाने तब्बल १२१ बनावट अँड्रॉइड अ‍ॅप्स (APK) तयार केल्याचा धक्कादायक प्रकार सूरत येथून समोर आला आहे. या अ‍ॅप्सचा वापर करून देशभरातील जवळपास २,९२८ जणांची सुमारे ६५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी सुरत सायबर क्राइम पोलिसांनी उत्तर प्रदेशातील आरोपीला अटक केली आहे.

बनावट PNB One अ‍ॅपमुळे उघड झाला प्रकार

'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरतमधील एका व्यक्तीने PNB One या नावाचे बनावट मोबाईल अ‍ॅप डाउनलोड केले. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये परस्पर काढण्यात आले. या तक्रारीनंतर सुरत सायबर क्राइम पोलिसांनी तपास सुरू केला आणि बनावट अ‍ॅप्स तयार करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

१२१ बनावट APK फाइल्स तयार केल्याचा आरोप

तपासात उत्तर प्रदेशातील कासगंज येथील रोहित शाक्य (१८) याचे नाव समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, रोहितने १२१ बनावट APK फाइल्स तयार करून त्या झारखंडमधील कुख्यात जामतारा सायबर टोळीला पुरवल्या. या अ‍ॅप्सचा वापर करून देशभरातील नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

२१ हजारांहून अधिक जणांनी डाउनलोड केली अ‍ॅप्स

अतिरिक्त पोलीस आयुक्त करणराज वाघेला यांनी सांगितले की, आरोपीने तयार केलेली बनावट अ‍ॅप्स २१,६७२ जणांनी डाउनलोड केली होती. त्यापैकी २,९२८ जणांची सुमारे ६५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

AI आणि YouTube वरून शिकला कोडिंग

पोलिसांच्या तपासानुसार, रोहित गेल्या दोन वर्षांपासून ही बनावट अ‍ॅप्स तयार करत होता. त्याने यूट्यूबवरील मोफत व्हिडिओ आणि AI आधारित टूल्स वापरून APK तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यानंतर तो प्रत्येक APK फाइल दरमहा १५ हजार रुपयांच्या सबस्क्रिप्शनवर सायबर गुन्हेगारांना विकत असल्याचा आरोप आहे.

बँका, सरकारी योजना आणि प्रसिद्ध ब्रँड्सच्या नावाने अ‍ॅप्स

रोहितने PNB One, SBI, Axis Bank, UCO Bank, American Express, BigBasket, DMart, PM-Kisan, Pension, RTO Challan, Campa तसेच Customer Support अशा विविध बँका, सरकारी योजना आणि लोकप्रिय ब्रँड्सच्या नावाने बनावट अ‍ॅप्स तयार केली होती. ही अ‍ॅप्स मूळ अ‍ॅप्ससारखीच दिसत असल्याने अनेकांनी ती डाउनलोड केली आणि फसवणुकीला बळी पडल्याचा आरोप आहे.

गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

तपासादरम्यान पोलिसांनी रोहितला कानपूरमधील एका हॉटेलमधून अटक केली. तो तेथे आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेला होता. आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असून, या सायबर फसवणूक रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

एअरपोर्टकडे निघालेल्या महिला केबिन क्रूवर बलात्कार; २३ वर्षीय कॅब चालक अटकेत

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Badlapur : साडी आणली नाही म्हणून थेट नवऱ्याचा घेतला जीव; पत्नी अटकेत

"जयंती म्हणून मानताना मन तुटून जातंय..."; अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट