नवी दिल्ली/लेह : पूर्व लडाखमध्ये रणगाडा सराव सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आणि त्यामध्ये लष्कराचे पाच जवान शहीद झाले. नदी ओलांडताना पाण्याची पातळी अचानक वाढली आणि सराव करणारे रणगाड्यावरील पाच जवान शहीद झाले.
लष्कराचे जवान रणगाड्याचा नियमित सराव करीत होते, तेव्हा बर्फ वितळून दौलत ओल्डी बेग परिसरातील नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामध्ये ५ जवान शहीद झाले. या पाचही जवानांचे मृतदेह सापडले आहेत. सरावात लष्कराचे अनेक रणगाडे होते. नियंत्रणरेषेजवळ एका ‘टी-७२’ रणगाड्याद्वारे नदी कशी ओलांडली जाते याबाबतचा सराव सुरू होता. जेव्हा जवान नदी ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा अचानक पाण्याची पातळी आणि प्रवाह वाढला आणि त्यामध्ये रणगाडा वाहून गेला आणि जवान शहीद झाले.
संरक्षण मंत्र्यांकडून शोक व्यक्त
लडाखमध्ये नदी ओलांडताना झालेल्या दुर्दैवी अपघातात भारतीय लष्कराच्या पाच जवानांना आपले प्राण गमवावे लागल्याने मी खूप दु:खी झालो आहे. आमच्या सैनिकांनी देशासाठी केलेली सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दुःखाच्या वेळी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे, अशी पोस्ट राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’वर टाकली आहे.