विजापूर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) वाहन शक्तिशाली स्फोटकांच्या सहाय्याने उडविले. त्यामध्ये दलाचे आठ जवान शहीद झाले, तर एक स्थानिक वाहनचालकही स्फोटात ठार झाला.
नक्षलवादविरोधी मोहिमेवरून परतत असताना अमबेली गावाजवळ नक्षलवाद्यांनी दलातील जवानांची स्कॉर्पिओ गाडी पेरून ठेवलेल्या स्फोटकांच्या सहाय्याने उडविली. गेल्या दोन वर्षांत सुरक्षा दलावर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे, तर २०२५ मधील हा पहिलाच हल्ला आहे, असे बस्तर परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.
दंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलवादविरोधी मोहिमेवरून जवान स्कॉर्पिओ गाडीतून परतत असताना नक्षलवाद्यांनी डिटोनेटरच्या सहाय्याने शक्तिशाली स्फोट घडविला. त्यामध्ये गाडीतील आठ जवान शहीद झाले, तर स्थानिक वाहनचालकही ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवून मृतदेह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली आहे. नारायणपूर, दंतेवाडा आणि विजापूरच्या सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, जिल्हा राखीव दल आणि एसटीएफचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले होते. तेव्हा शनिवारी झालेल्या चकमकीत दलातील हेडकॉन्स्टेबल सन्नू करम हे शहीद झाले. गोळीबार थांबताच चार नक्षल्यांचे मृतदेह आणि एके-४७ रायफल व सेल्फ लोडिंग रायफलसह स्वयंचलित शस्त्रास्त्रे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली. दरम्यान, चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरूच होती. नारायणपूर, दंतेवाडा, कोडागाव आणि बस्तर जिल्ह्यांत डीआरजी पथकासोबत नक्षलविरोधी मोहीम शुक्रवारपासून सुरू करण्यात आली होती.
राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
दरम्यान, नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात आठ जवान शहीद झाले, तर एक स्थानिक वाहनचालक ठार झाला. त्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यांनी शोक व्यक्त केला आहे. नक्षलवादाचा पूर्ण बीमोड करण्याचा निर्धार सरकारने केला आहे, असे त्या म्हणाल्या.
अमित शहा यांचा निर्धार
देशातून मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा पूर्ण नि:पात करण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. स्फोटात जे जवान शहीद झाले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असेही शहा म्हणाले. जवान शहीद झाले त्याबद्दल दु:ख व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत. मात्र, मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा नि:पात केला जाईल, असे गृहमंत्री म्हणाले.