नवी दिल्ली : मद्य घोटाळ्यापाठोपाठ आता 'आप'च्या सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध दोन हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ माजली असून त्यामुळे या दोन नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
'आप' सरकारच्या काळात शाळांमधील वर्गखोल्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) कठोर कारवाई केली आहे. एसीबीने तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण १२ हजार ७४८ वर्गखोल्या आणि इमारतींच्या बांधकामात दोन हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याशी संबंधित आहे.
कोणी केली तक्रार
भाजप नेते हरीश खुराणा, कपिल मिश्रा, नीलकंठ बक्षी इत्यादींनी शाळेच्या वर्गखोल्यांच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. एसीबीने म्हटले आहे की, दिलेल्या निविदेनुसार, शाळेच्या खोलीच्या बांधकामाचा एकवेळचा खर्च प्रति खोली सुमारे २४.८६ लाख रुपये ठरवण्यात आला. परंतु, दिल्लीमध्ये अशा खोल्या साधारणतः प्रति खोली सुमारे ५ लाख रुपयांना बांधता येतात. शिवाय, असाही आरोप आहे की, हा प्रकल्प ज्या ३४ कंत्राटदारांना देण्यात आला होता, त्यापैकी अनेकांचे आम आदमी पक्षाशी संबंध आहेत.
चौकशीत समोर आले धक्कादायक खुलासे
वर्गखोल्या सेमी पर्मनंट स्ट्रक्चर म्हणून बांधल्या गेल्या होत्या, ज्यांचे आयुष्य ३० वर्षे असते. परंतु या वर्गखोल्यांची किंमत आरसीसी (पक्के) वर्गखोल्यांइतकीच होती. हे कंत्राट ३४ कंत्राटदारांना देण्यात आले, त्यापैकी बहुतेकांचे आपशी संबंध असल्याचे सांगितले जाते. काम वेळेवर पूर्ण झाले नाही, त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली. कोणत्याही निश्चित प्रक्रियेचे पालन न करता सल्लागार आणि आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली, ज्यामुळे खर्च वाढला. केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालात अनेक अनियमितता उघड झाल्या, परंतु तीन वर्षे त्या दडपून ठेवण्यात आल्या.